वारकऱ्यांना टोल माफ, एकनाथ शिंदेंची घोषणा

गुरूवार, 7 जुलै 2022 (12:25 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूरच्या वारकऱ्यांबाबत एक आढावा बैठक घेतली. खड्डे लक्षपूर्वक भरा, अपघात होऊन कोणी जखमी होणार नाही याची दक्षता घ्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
 
ही बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोकणातल्या गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोलमाफीची घोषणा केली आहे तसंच अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची वारीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करावी असे आदेशही त्यांनी दिले.
 
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल न आकरण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आषाढी वारीसाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की यंदाच्या एकादशीचे अतिशय चांगले नियोजन केलेले आहे. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यामुळे यावर्षी वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे याचा विचार करून नियोजन केलेले आहे. व्हीआयपी व्यक्तीपेक्षा वारकरी महत्त्वाचे आहे, त्यांचे संरक्षण केले पाहिजे, असे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती