प्रभाग रचनेवर येत्या बुधवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत यावर फेरविचार होणार

शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (22:15 IST)
राज्य सरकारने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग रचनेची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने  घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई वगळता इतर सर्व महापालिका निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल याबाबत घोषणा करण्यात आली. या पार्श्वभुमीवर काॅग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
 
महापालिका निवडणूकीसाठी  3 सदस्यीय प्रभाग हा मंत्रीमंडळाचा सामूहिक निर्णय आहे. परंतु, त्यात मतमतांतरे असू शकतात, त्यामुळे येत्या बुधवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत यावर फेरविचार होऊ शकतो असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
 
पुढे बोलताना थोरात म्हणाले की, तर, यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे, तसेच काही मते वेगळी असणेही शक्य आहे. मंत्री मंडळात निर्णय झाला त्यावेळी एकमतानेच झाला. नंतर यावर झालेल्या चर्चेत काही जणांची मते वेगळी असल्याचे लक्षात आले. त्याचाही विचार व्हायला पाहिजे. असं त्यांनी सांगितलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती