शाळा, मंदिरांनंतर आता राज्यातील थिएटर्स उघडणार, कधी जाणून घ्या

शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (14:51 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्यामुळे राज्य सरकारनं महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. आता राज्यातील शाळा आणि मंदिर, सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सोबतच राज्यातील सिनेमागृह सुरु करण्यासही राज्य सरकारनं संमती दिल्याचं समजतंय. 
 
22 ऑक्टोबरपासून राज्यातील थिएटर्स सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर नाट्यगृहांबाबतही राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. 
5 नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरु होणार?
 
मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 50 टक्क्यांच्या मर्यादेसह 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी दिली होती. नाट्यक्षेत्रातील काही मान्यवर कलाकारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाट्यगृह सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली होती. 
 
4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होतील
शुक्रवारी राज्य सरकारनं शाळा आणि मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न झाला होता मात्र त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. 
 
गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत अशात मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं असून शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
 
नवरात्रीपासून राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळं सुरु
एका आणखी महत्त्वाचा निर्णयात नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे भक्तांसाठी खुली राहतील. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मंदिरे आणि धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटाइरचा वापर हा झालाच पाहिजे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती