आगामी निवडणुकांसाठी मनसेचे पुण्यात बुधवारी शक्तीप्रदर्शन, हजारो मनसैनिक जमणार

मंगळवार, 8 मार्च 2022 (07:50 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापनदिन सोहळा यंदा पुणे येथे साजरा होणार आहे. बुधवार ०९ मार्च रोजी गणेश कला क्रीडा केंद्र, नेहरू स्टेडीयम शेजारी, स्वारगेट, पुणे येथे मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांचा भव्य मेळावा होणार आहे. 
 
मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार असून राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक सह प्रमुख महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेला या मेळाव्यास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या मेळाव्या करीता नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदारसंघांतून तालुका अध्यक्षांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने वाहने निघणार असून प्रत्येक वाहनांवर मनसेचा झेंडा आणि मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आव्हान करणारे स्टिकर्स लावण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता पुणे येथे होणाऱ्या या सभेसाठी सकाळी १० वाजता नाशिकहून सर्व गाड्या सुटणार आहे. पुण्याला जातांना सर्व वाहनांची नोंदणी होऊन टोलनाक्यावर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांच्या चहा, पाणी, नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. चहापान नाश्त्या नंतर वाहने पुण्याला रवाना होतील. पुण्याहून परततांना पक्षातर्फे मनसैनिकांची रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती