कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने मिरज सिव्हीलमध्ये गुरूवारपासून नॉन कोविड रुग्ण सेवा

मंगळवार, 8 मार्च 2022 (07:43 IST)
कोरोनाची तिसरी लाट ओसरली असल्याने गुरूवारी 10 मार्चपासून मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 65 टक्के क्षमतेने हंगामी नॉन कोविड रुग्णसेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. महाविद्यालयीन परिषद आणि कोविड व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीत कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात केवळ दोन विभागात 70 बेड आरक्षित ठेवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
मिरज शासकीय रुग्णालयाचे नॉन कोविड रुग्णालयात रुपांतर केल्यानंतर विविध शस्त्रक्रिया, मेडीसिन, अस्थिरोग, स्त्रीरोग, प्रसुती तसेच बालरोग विभागासह बाह्य रुग्ण विभाग, आणि अतिदक्षता विभागही पूर्ववत होणार आहे. तर आंतररुग्ण विभाग सांगली सिव्हीलमध्ये सुरू राहिल. हंगामी काळासाठी मिरज शासकीय रुग्णालयाचे नॉन कोविड रुग्णालय केले जाणार असून, एक एप्रिलपर्यंत कोरोना बाधितांची संख्या पूर्णत घटल्यास मिरज शासकीय रुग्णालय शंभर टक्के क्षमतेने नॉन कोविड रुग्णालय होईल, असे डॉ. नणंदकर यांनी यावेळी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती