कायदा हातात घेणा-यांचा मुलाहिजा ठेवायचा नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

सोमवार, 8 जानेवारी 2024 (09:05 IST)
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी २० जानेवारी रोजी ‘मुंबईत येणारच’ अशी भूमिका घेतलेली आहे. त्यावरून ‘काही लोक मुंबईला येण्यासंबंधी घोषणा करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन ७५ वर्षे झाली. आजही त्याच संविधानाच्या आधारावर देश मार्गक्रमण करत आहे. संविधानाने घालून दिलेल्या चौकटीचा आदर झाला पाहिजे. जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी केला, तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, हेदेखील लक्षात ठेवा.’ असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटलांना टोला लगावला.
 
दम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा आज कल्याण येथे संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्यांवर आपली रोखठोक मतं व्यक्त केली. आम्ही विकासासाठी सत्तेत सामील झालो आहोत, असे त्यांनी सुरुवातीला सांगून महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून चाललेल्या आरोप-प्रत्यारोपावर भाष्य केले. तसेच जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या विधानावर टीका केली. ‘‘वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. काहीजण विकासाचे बोलण्यापेक्षा नको त्या विषयावर बोलत आहेत’’, असे अजित पवार म्हणाले.
 
मराठा आरक्षणाच्या बाबत बोलत असताना अजित पवार म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यात कुणाचंच दुमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात एकमत आहे. परंतु आज राज्यात ६२ टक्के आरक्षण आधीपासूनच आहे. आता आणखी आरक्षण देण्यासाठी कायदेशीर मार्ग तपासावे लागतील. पण काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईला येण्यासंबंधी घोषणा करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन ७५ वर्षे झाली. आजही त्याच संविधानाच्या आधारावर देश मार्गक्रमण करत आहे. संविधानाने घालून दिलेल्या चौकटीचा आदर झाला पाहिजे. जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी केला, तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, हेदेखील लक्षात ठेवा.’’
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती