जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत विविध धर्माचे सण उत्सव साजरे होणार आहेत. उत्सव साजरे करताना अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच निषेध, निषेधाच्या घटना चालू असून, नेत्यांची कार्यालये तोडफोडीच्या घटना चालू असून, प्रतिकात्मक पुतळ्यांच्या दहन, जोडे मारो आंदोलन इत्यादीमुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37(1) चे. प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेसाठी पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पत्रान्वये विनंती केले आहे. त्यानुसार जिल्हयात सार्वजनिक शांतता किंवा सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत कलम 37 (1) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर, यांनी त्यानां प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.आदेशात नमूद केलेल्या कालावधीत कोणाही इसमास पुढील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे.
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे,व्यक्तींचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. अशा प्राधिका-याच्या मते ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगविक्षेप करणे, किंवा विडंबन करणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा प्रसार करणे.यास मनाई राहील.
हा आदेश पुढील व्यक्तीना लागू होणार नाही. शासकीय सेवेतील व्यक्तिंना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तिंना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे, अशा व्यक्तिंना हा आदेश लागू होणार नाही. हा आदेश अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सिमेच्या हद्दीत २९ सप्टेंबर च्या मध्यरात्रीपासून ते दि. १९ ऑक्टोबर च्या मध्यरात्रीपर्यंत जारी राहील. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिले आहेत.