लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रातील भाजपसरकारची कायरता आहे - नवाब मलिक

सोमवार, 17 मे 2021 (12:19 IST)
विदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच... किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आहे... लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रसरकारची कायरता आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 
 
दरम्यान संपूर्ण देश एकजूट आहे. किती लोकांना अटक करताय बघुया असे स्पष्ट आव्हानही नवाब मलिक यांनी दिले आहे. 
 
डाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस विदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्रसरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे तर काहीजण पाच कोटी कंपलसरी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाहीय तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे नवाब मलिक म्हणाले. 
 
मोदीजी, आमच्या मुलांच्या हक्काची लस विदेशात का पाठवली अशी पोस्टर्स काही लोकांनी लावली आहेत. तर भाजपचे काही लोक लहान मुलांची लस तयारच झाली नसल्याचे बोलत आहेत. 
 
सारे भारतीय भारतमातेची लेकरं आहेत. लस विदेशात पाठवली तर प्रश्न लोकं विचारणारच ना? परंतु केंद्रसरकार प्रश्न विचारणाऱ्या लोकांना गुन्हा दाखल करुन अटक करत आहे. संपूर्ण देश प्रश्न विचारतोय... किती लोकांना अटक करणार मोदीजी असा संतप्त सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती