रोजगार हमी आणि फलोत्पादन योजनांची गाव पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर सरपंचांना मार्गदर्शन करण्याकरिता सरपंच मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील रोहयोंच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात राज्यातील सरपंच प्रतिनिधींबरोबर मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार आणि मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.भुमरे म्हणाले, “राज्यात मोठ्या प्रमाणात रोहयोची कामे सुरू आहेत. पानंद रस्ते, विहिरींना मंजुरी देण्यात येत आहे. अनेक उपक्रमांचे नियम व अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. सरपंचांनी शासन निर्णयांचा अभ्यास करावा. गावाच्या विकासासाठी सरपंचांनी रोहयो अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना श्री. भुमरे यांनी सरपंचांना दिल्या.
रोजगार हमीची बिले वेळेत उपलब्ध करण्यात यावीत.अकुशल कामांची दर आठवड्याला तर कुशल कामांची बिले एक महिन्याच्या आत मिळावीत. कुशल कामांच्या बिलांच्या बाबतीत आढावा तसेच थकीत बिलांचा आढावा घेऊन ती अदा करण्यात यावीत. खोट्या तक्रारींची चौकशी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत व्हावी यासह इतर समस्या सरपंच शिष्टमंडळाने यावेळी उपस्थित केल्या. त्यावर मंत्री श्री. भुमरे यांनी राज्य शासनाच्या स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल, असे यावेळी सांगितले. या बैठकीस पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत सर्जेराव पाटील यांच्यासह राज्यातील विविध ठिकाणचे सरपंच उपस्थित होते.