समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याची 'ही' आहेत वैशिष्ट्यं

शुक्रवार, 26 मे 2023 (20:19 IST)
facebook
शिर्डी ते भरवीर या समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्याचे आज (26 मे) लोकर्पण होत आहे. 80 किलोमीटर लांबीचा हा दुसरा टप्पा आहे. त्यामुळे शिर्डीरून इगतपुरी तालुक्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना या रस्त्याचा फायदा होणार आहे.
 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
 
नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटरच्या समृध्दी महामार्गाचा 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर पाच महिन्यात हा दुसरा टप्पा सुरू होत आहे.
 
कसा आहे समृध्दी महामार्गाचा दुसरा टप्पा?
समृध्दी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भरवीरपर्यंत असणार आहे.
 
80 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यात 7 मोठे पूल, 18 छोटे पूल, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग आणि हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. यावर तीन टोल गेट असणार आहेत.
 
सिन्नर येथील गोंदे इथून नाशिक आणि पुणे भागात जाण्यासाठी नागरिकांना फायदा होईल.
 
घोटी तालुका इगतपुरीपासून भरवीरजवळचा इंटरचेंज हा अंदाजे 17-18 किलोमीटरचा आहे. या इंटरचेंजमुळे शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना फायदा होईल.
 
शिर्डी ते भरवीर पूर्वी अडीच तासांत होणारा प्रवास समृध्दी महामार्गामुळे 30 ते 35 मिनिटांत होणार असल्याचं एसएसआरडीकडून सांगण्यात येत आहे.
 
दुसऱ्या टप्यामुळे एकूण 701 किलोमीटरच्या समृध्दी महामार्गातील 610 किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
 
समृध्दी महामार्गावर होणाऱ्या अपघातासाठी काय उपाययोजना?
नागपूर - शिर्डी समृध्दी महामार्ग सुरू झाला आणि त्यावर एकामागोमाग एक अपघात होऊ लागले. या महामार्गाचं काम नीट केलं नसल्यामुळे हे अपघात होत असल्याचा आरोप विधानसभेत झाला.
 
पोलीसांच्या माहितीनुसार, “जानेवारी ते एप्रिलपर्यंत या चार महिन्यात समृध्दी महामार्गावर 358 अपघात झाले आहेत. या अपघातात 39 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. 143 जण या अपघातात गंभीर जखमी झाले असून 236 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.”
 
उष्णतेने घर्षण होऊन टायरफुटी, प्राणी रस्त्यावर आल्यामुळे, चालकाला डुलकी लागल्यामुळे, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे अपघात होत असल्याची कारणं समोर आली आहेत.
 
समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्यात यासाठी काही विशेष उपाययोजना केली आहे का? हे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता ते म्हणाले, “दुसऱ्या टप्याच्या रस्त्यावर ‘इम्पॅक्ट एटेन्यूएटर’ या उपकरणाची रचना केली गेली आहे.
 
रस्त्याच्या बाजूला आणि मधल्या कठड्यांजवळ 244 ‘इम्पॅक्ट एटेन्यूएटर’ बसवण्यात आले आहेत. इम्पॅक्ट एटेन्यूएटरमुळे आदळणाऱ्या वाहनाची गतीज उर्जा शोषली जाते. त्यामुळे अपघातात प्रवासी जोरदार आदळण्याची तीव्रता कमी होते.
 
पण याचा कितपत फायदा होतो हे प्रत्यक्षात प्रवास केल्यानंतर लक्षात येईल.
 
मुंबई ते नागपूर 812 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 14 तास लागतात. समृद्धी हायवेमुळे हे अंतर पार करण्यासाठी 8 तास लागतील. 701 किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे.
 
औरंगाबाद हे मध्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूर जाण्यासाठी 4 तास आणि औरंगाबाद ते मुंबई जाण्यासाठी 4 तास लागतील.
 
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 55 हजार 477 कोटी रूपये आहे.
 
हा मार्ग राज्यातल्या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांचा सामावेश आहे.
 
20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र
या मार्गावर 50 हून अधिक उड्डाणपूल आणि 24 इंटरचेंजेस आहेत. हे इंटरचेंजेस वाहनांसाठी एक्झिट पॉईंट आहेत.
 
दर पाच किलोमीटरवर अत्यावश्यक टेलिफोनची सुविधा, फूड प्लाझा, रेस्टॉरंटस्, बस बे, ट्रक टर्मिनस, ट्रॉमा सेंटर या महामार्गावर असतील, असं सांगण्यात आलं आहे.
 
समृद्धी महामार्गावर वायफायची सुविधा असेल. तसंच ट्राफिक कंट्रोलसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
 
महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या महामार्गावर लँडस्केपींग, ब्रिज ब्युटीफीकेशनची सुविधा असेल.
 
हा महामार्ग वनक्षेत्रातून जात असल्यामुळे वन्यजीवन प्राण्यांच्या मुक्त वावरासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत.
 
या भुयारांमध्ये वाहनांचे आवाज रोखण्यासाठी ध्वनी विरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
 
सुरुवातीला विरोध नंतर बाळासाहेबांचंच नाव
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात समृद्धी महामार्गाची घोषणा करण्यात आली. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पासाठी जमिन भूसंपादनाला अनेक ठिकाणी कडाडून विरोध झाला.
 
पाच पट मोबदला देऊन जमिन भूसंपादीत करण्यात आली. सुरवातीला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शिवसेनेने समृद्धी महामार्गाला विरोध केला पण नंतर पक्षाने आपली भूमिका बदलली.
 
या महामार्गाला हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नावं देण्याची मागणी 2014 च्या युती सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली होती. पण भाजपकडून अटलबिहारी वाजपेयींचं नाव देण्याचा आग्रह होता.
 
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पेच निर्माण झाला. नोव्हेंबर 2019 ला महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हे नावं बदलून हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ठेवलं.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती