महाविकास आघाडीमध्ये कोणताही विसंवाद नाही : एकनाथ शिंदे

बुधवार, 23 जून 2021 (08:05 IST)
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घ्या अशी मागणी केली आहे. यावर शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, समन्वयक समितीमध्ये महामंडळांबाबत चर्चा करण्यात आली आहे. इतर बाबींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत राज्यातील महामंडळांबाबत चर्चा झाली असून काही महामंडळांचा निर्णय झाला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
 
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे की, समन्वयक समितीची बैठक होती. तिन्ही पक्षाचे पदाधिकारी या बैठकीत होते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बैठक झाली महामंडळच्या बाबतीत चर्चा झाली असून काही महामंडळांबाबत निर्णय झाले असून काही महामंडळ शिल्लक आहेत एकंदरीत सर्व महामंडळांबाबत निर्णय झाल्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. ३ पक्ष आहेत या ३ पक्षांमध्ये वेगवेगळी महामंडळे असतील यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य याचं वाटप रेशो प्रमाणे होईल. चर्चा सुरु असून लवकरच यावर निर्णय होईल प्रत्येक पक्षाच्या आमदारांच्या संख्येप्रमाणे निर्णय होईल कोणताही वादविवाद नाही असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
 
महाविकास आघाडीमध्ये कोणताही विसंवाद नाही. कुठल्याही प्रकारचा गैरसमज नाही. सर्व पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काम करत आहेत. चांगले निर्णय सरकार घेत आहे त्यामुळे कोणताही मतभेद नाही. सरकार मजबूतीने काम करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना परिस्थिती आटोक्यात आणली आहे. मुख्यमंत्र्यांची राज्यातील कामगिरीचे अनेक राज्यांनी अनुकरण केलं असून पंतप्रधान मोदी आणि सर्वोच्च न्यायालयानेही प्रशंसा केली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती