रुग्ण वाढणाऱ्या १२ जिल्ह्यांवर विशेष लक्ष्य आहे : राजेश टोपे

शनिवार, 1 जानेवारी 2022 (21:19 IST)
महाराष्ट्रात दहा दिवसांत कोरोनाचे सक्रिय रुग्ण १८ हजारांनी तर ओमिक्रॉनचेही रुग्ण ३८९ ने वाढले. दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांपैकी केवळ पाच टक्‍केच रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज लागत आहे.
ओमिक्रॉनच्या एकाही रुग्णाला ऑक्‍सिजन लागलेला नाही. तरीही, रुग्ण वाढणाऱ्या १२ जिल्ह्यांवर विशेष लक्ष्य आहे. त्याठिकाणी रुग्ण वाढल्यास निर्बंध आणखी कडक होतील,’’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, नगर, नाशिक, सांगली, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद येथे रुग्ण वाढत आहेत. काही जिल्ह्यांमधील २० टक्‍के व्यक्‍तींनी अजूनही प्रतिबंधित लस टोचलेली नाही.
ते लोक कोरोनाचे वाहक ठरू नयेत म्हणून सुक्ष्म नियोजन केले आहे. पुन्हा कडक लॉकडाउन करण्याची वेळ येणार नाही, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.’’राज्यातील रुग्णालयांत पीपीई संच, चाचणी संच, ऑक्‍सिजन, साधे व ऑक्‍सिजन, खाटा, व्हेंटिलेटर, डॉक्‍टर आणि औषधांची पुरेशी उपलब्धता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.गर्दीतून कोरोना, ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घातले असून रुग्ण वाढले तर अशा कार्यक्रमांवर बंदी घातली जाईल.
सरसकट लॉकडाउन केला जाणार नसून पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढतील, त्याठिकाणचे निर्बंध कडक होतील असे राजेश टोपेंनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती