एक्स रे टेक्निशियननेच मारला हॉस्पिटलच्या २४ लाखांच्या वस्तूंवर डल्‍ला

शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (17:48 IST)
नाशिक (प्रतिनिधी) : सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या वस्तुसंग्रह खोलीतून २४ लाखांच्या वस्तू घरफोडी करून तेथीलच एक्स रे टेक्निशियनने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की दि. २८ जुलै ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या वस्तुसंग्रह केंद्रात रुग्णालयासाठी लागणार्‍या महागड्या वस्तू ठेवल्या होत्या. या वस्तू अज्ञाताने चोरून नेल्या.
यात ५ लाख ५४ हजार ३४० रुपये किमतीचे चार मल्टीपॅरामॉनिटर, २ लाख ४० हजार रुपये किमतीचे चार ईसीजी मशीन, ७० हजार रुपये किमतीचे दोन सिरींज पंप, ६ लाख रुपये किमतीचे तीन डी-फॅब्रिलेटर, ६ लाख रुपये किमतीचे तीन कॉन्ट्री, तीन लाख रुपये किमतीचे चार बायपॅप मशीन या महागड्या वस्तू वस्तुसंग्रहालयाच्या खोलीतून चोरीस गेल्या आहेत.
रुग्णालयातून अशा प्रकारे वस्तू चोरीला गेल्याने तेथील सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून अनिल कासारविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती