हेलिकॉप्टरची चाचणी करताना भीषण अपघातात तरुणाचा दुर्देवी अंत

बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (14:20 IST)
यवतमाळ येथील फुलसावंगी मधील  एका तरुणाचे आपले ध्येय साध्य करताना अपघाती निधन झाल्याचे वृत्त मिळाले आहे.शेख इस्माईल उर्फ मुन्ना हेलिकॉप्टर वय वर्ष 28 असे या मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 
हा तरुण गेल्या 3 -4 वर्षा पासून सिंगल सीटचे हेलिकॉप्टर तयार करण्याचा नादात होता .हेच त्याचे ध्येय होते.हा आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर एका वेल्डिंगच्या दुकानात काम करायचा आणि रात्री आपले सिंगल सीटर हेलिकॉप्टर तयार करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी हेलिकॉप्टर बनवायचा.खरं तर तो फक्त 9 वी पर्यंतच शिकलेला होता.परंतु असं म्हणतात की ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण अडत नाही.तसेच या तरुणा सोबत देखील झाले.त्याने आपल्या कल्पनाशक्ती आणि कलेचा वापर करून हेलिकॉप्टर तयार करण्याचे धाडस केले.
 
या साठी त्याने आपल्या सिंगल सीटर हेलिकॉप्टर मध्ये मारुती 800 चे इंजिन वापरले आणि त्याचे प्रात्यक्षिक करून 'पेटंट 'मिळविण्याच्या तयारी होता. त्यासाठी त्याने मंगळवारी रात्री प्रात्यक्षिक घेण्याचे ठरवले.परंतु नियतीच्या मनात काही औरच होते.
 
प्रात्यक्षिक घेताना हेलिकॉप्टरचा मागील भागाचा पंखातुटून वरील पंख्याच्या पात्यावर आदळला.आणि वरील पंखाचा पाता तुटून कॅबिन मध्ये बसलेल्या मुन्ना हेलिकॉप्टर म्हणजेच शेख इस्माईलच्या डोक्यावर पडला.त्याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली.हे बघता त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असताना त्याचे दुर्देवी निधन झाले.त्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.त्याच्या कुटुंबात त्याचे आई,वडील,भाऊ बहीण असा भला मोठा परिवार आहे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती