गोदामातून विषारी पाणी नाल्यात सोडल्याने नाल्यातील मासे मेले

सोमवार, 17 जुलै 2023 (08:55 IST)
उरण चिरनेर येथिल श्रीसमर्थ वेअर हाऊस नामक एका गोदामातून विषारी आणि केमिकल युक्त पाणी नाल्यात सोडल्यामुळे नाल्यातील सर्व पाणी दुषित झाले असून नाल्यातील मासे मरून पडले आहेत. हे दुषित पाणी आजूबाजूच्या शेतीमध्ये जाऊन त्याचा दुष्यपरिणाम शेतीवर होण्याची शक्यता असल्याने संबधीत गोदाम चालकावर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत चिरनेर- खारपाडा रस्त्यालगत श्री समर्थ वेअर हाऊस असून या गोदामातून बुधवारी ( दि13) विषारी केमिकल युक्त पाणी नाल्यात सोडण्यात आले होते. हे पाणी नाल्यात सोडल्यामुळे संपूर्ण नाल्यातील पाणी लाल झाले आणि त्यामुळे या नाल्यात असणारे मासे तडफडून मरू लागले.
 
ग्रामस्थांना ही बातमी समजल्यानंतर त्यांनी या गोदाम चालकाला याबाबत जाब विचारला त्यावेळेस त्यांनी गोदामातील दोन वाटाण्यांच्या गोणी भिजल्या असलामुळे ते पाणी नाल्यात गेले असल्याचे सांगितले. मात्र, वाटाण्याच्या पाण्यापासून पाणी दुषित होवू शकत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी कोप्रोली येथिल ग्लोबिकॉन सीएफएस मधून असेच दुषित पाणी सोडल्याने संपूर्ण नाल्याचे पाणी दुषित होवून मासे मेले होते. आत्ता चिरनेर विभागातील अनधिकृत पणे थाटलेल्या गोदामांमध्ये देखिल हे प्रकार घडू लागले आहेत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती