'वाघानं झोपलेल्या मंदाबाईंना उचलून नेलं, आम्ही धावत सुटलो; पण...'

गुरूवार, 22 जून 2023 (17:27 IST)
नितेश राऊत
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू होत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून वनविभागाने वाघांना जेरबंद करण्याची मोहीम सुरु केली आहे. पण वाघांना जेरबंद करणे हा खात्रीलायक उपाय आहे का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
 
गेल्या तीन महिन्यात सावली तालुक्यातील काही गावांमध्ये चार जणांचा बळी घेणारी वाघीण वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने जेरबंद केली.
 
या वाघिणीमुळे सावली तालुक्यातील बोरमाळा, चेख विरखल, वाघोलीबुटी या गावांमध्ये भीतीचे वातावरण होते.
 
यापूर्वी जंगल, शेतात काम करणाऱ्या नागरिकांवर वाघांचे हल्ले व्हायचे, मात्र गावात येऊन घराबाहेर झोपेत असणाऱ्या नागरिकांवरही वाघ हल्ला चढवतोय.
 
27 मे रोजी सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विरखल चक या गावात वाघाने रात्री अंगणात झोपलेल्या 57 वर्षीय मंदा सिडाम या महिलेवर हल्ला चढवला. झोपेतच असताना मंदा यांना वाघाने उचलून जवळपास 20 फूट लांब नेले.
 
या हल्ल्यात मंदा जागीच ठार झाल्या. हा हल्ला होत असताना बाजूच्या खाटेवर झोपलेल्या मंदा यांच्या नणंदने आरडाओरडा केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
 
सुमित डवलकर सांगतात, "आम्ही सगळे निवांत झोपलो होतो, बापू जागा होता. पावणे दोन वाजता ती घटना घडली. एकदम 'बापरे' म्हटलं आणि आम्ही जागे झालो. तिघही बापलेक बाहेर पडलो. मंदाबाई बाजेवर काही दिसल्या नाहीत.
 
आम्ही सहा जण आणि गल्लीतील इतर लोक धावत सुटलो. पण त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. अजूनही तो क्षण आठवला की अंगावर काटा येतो."
 
विरखल चक या गावामध्ये आता वाघाची इतकी भीती पसरली की नागरिकांनी बाहेर झोपणेच बंद केलं आहे.
 
डवलकर सांगतात, "आता रात्री बाहेर कोणी झोपत नाही. सकाळी पण लवकर कुणी उठत नाही. आधी झोपेतून चार वाजता उठायचे. आता सहा वाजल्याशिवाय कोणी उठत नाही."
 
वाघाच्या हल्लाचा हा संपूर्ण थरार बाजूला झोपलेल्या कमल उईके यांनी पाहिला होता.
 
त्या म्हणाल्या, "मी एकदम रडत उठले, की माझ्या बहिणीला वाघाने नेलं म्हणून. बैलाच्या खुंट्याजवळून मी वाघाला जाताना पाहिले. धिप्पाड वाघ क्षणात दिसेनासा झाला. आम्ही काहीच करू शकलो नाही."
 
या हल्लानंतर वाघापासून स्वतःचा बचाव कसा करावा हे सांगण्यासाठी गावात फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
 
आता ट्रॅप कॅमेरेही बसवण्यात आले आहे. मात्र याच गावापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर वाघोली बुटी या गावामध्ये दुसरी घटना पुढे आली.
 
20 मे रोजी 55 वर्षीय प्रेमिला रोहनकर शेतात गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात प्रेमिला यांचा जागीच मृत्यू झाला.
 
कायम वाघाच्या दहशतीत राहणाऱ्या संतप्त गावकऱ्यांची वनविभाग वाघाचा बंदोबस्त करत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता.
 
या हल्लात ठार झालेल्या प्रेमीला यांचा मुलगा अश्विन रोहनकर याने या हल्लासाठी वनविभागाला दोषी ठरवलं.
 
तो म्हणतो, "आमचा घरातला जीव गेला आणि वनविभाग हातावर हात धरून बसला होता. तुम्हाला माहिती आहे की, वाघाचे हल्ले वाढत आहे. तुम्ही त्याचा बंदोबस्त का करत नाही?"
 
अश्विन सांगतो, "साडे दहाची वेळ होती. आई शौचासाठी शेताकडे गेली होती. तिथेच वाघाने तिच्यावर हल्ला केला. मृत्यूची बातमी वन विभागाला सांगितली."
 
ही आमच्या गावातली दुसरी घटना आहे. तरीही वन विभागाने ठोस पावलं उचलली नाहीत, अशी तक्रार अश्विनसोबत गावकऱ्यांचीही आहे.
 
तर दुसरीकडे वनविभागाने या हल्लखोर वाघिणीला जेरबंद केलं. तिची रवानगी नागपूरच्या गोरेवाडा ट्रान्झिट सेंटरमध्ये करण्यात आली आहे.
 
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्याचबरोबर मानवी वस्त्यांमध्येही वाघांचा वावर वाढला आहे.
 
काही दिवसांपूर्वी गडचिरोली शहरातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा परिसरातून एका वाघिणीला जेरबंद करण्यात आलं होतं. चंद्रपूरच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये या वाघिणीवर उपचार सुरू आहेत.
 
वाढत्या हल्लानंतर वनविभागाने वाघांची धरपकड करण्याची मोहीम सुरु केली. या रेस्क्यू पथकाने चांगली कामगीरी करत आतापर्यंत 12 वाघांना जेरबंद केलं आहे.
 
या हल्लेखोर वाघांना जेरबंद करून विविध ट्रान्झिट सेंटरमध्ये ठेवण्यात येतं. चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये एका वेळी दोन वाघांना ठेवण्याची क्षमता आहे.
 
मात्र कधी एका वेळी अनेक वाघ उपचारांसाठी याठिकाणी येतात. या सेंटरची क्षमता कमी असल्यामुळे इथून वाघांना गोरेवाडाच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये पाठवले जातात.
 
या ट्रान्झिट सेंटरची देखरेख करणारे कर्मचारी उमेश घानोडे सांगतात, "इथे दोन वाघ ठेवण्याची क्षमता आहे. पण कधी आम्हाला चार- पाच वाघांना सांभाळावं लागत. यातील बहुतांश वाघ हे नरभक्षक असतात.
 
ज्यावेळी वाघांना पकडलं जातं, तेव्हा त्यांचे रौद्र रूप बघायला मिळतं. डरकाळी, पिंजऱ्यातली हालचाल भयकंर असते. आम्ही त्यांच्यावर उपचार करून गोरेवाडाकडे रवाना करतो," धानोडे सांगत होते.
 
विदर्भात वाघ वाढले
विदर्भात वाघांची संख्या वाढत आहे. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 18 व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात किमान वाघांची संख्या 390 च्या जवळपास आहे. पण प्रत्यक्षात अंदाजे वाघांची संख्या 403 ते 490 इतकी असू शकते.
 
एकट्या ताडोबा आणि ब्रम्हपुरीच्या जंगलात वाघांची संख्या 140 च्या जवळपास गेली आहे. वाघांच्या वाढलेल्या संख्येमुळे हल्ले वाढले का, हा प्रश्न बीबीसी मराठीने ताडोबाच्या क्षेत्र संचालकांना विचारला.
 
त्यावर बोलताना जितेंद्र रामगावकर सांगतात, "कुठल्याही वनक्षेत्रात राहणारी लोकसंख्या ही वनावर अवलंबून आहे. अशा क्षेत्रात वनक्षेत्र आणि गावाचा परिसर याचा इंटरफेस मोठा असल्यास वन परीक्षेत्रात अशा घटना घडत असल्याचं रामगावकर म्हणाले."
 
मात्र वाघांचे सर्वाधिक हल्ले हे चंद्रपूर जिल्ह्यात का होत आहेत? वाघांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ हे एक कारण आहे का? ताडोबा अंधारीत वाघांना लागणारे क्षेत्र कमी पडत असल्यामुळे हल्ले वाढले आहेत का? नवीन वाघ हे जंगलातून बाहेर पडतात त्यामुळं वन्यजीव-मानव संघर्ष वाढलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
 
याबद्दल रामगावकर सांगतात, "ताडोबा अंधारी प्रकल्प हे वाघांचं सुरक्षित क्षेत्र आहे. 2022 या वर्षाात कोअर आणि बफर क्षेत्र मिळून 82 वाघांची नोंद झाली आहे. परंतु ताडोबा अंधारी प्रकल्पाच्या बाहेरचं जे प्रादेशिक वनक्षेत्र आहे ते सुद्धा तीन ते चार हजार स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे. त्यातही वाघांचा मोठा अधिवास आहे.
 
आता ज्या भागात वाघांची संख्या वाढली असेल अशा भागातल्या वाघांना स्थलांतरित केलं जातंय. नुकतंच ताडोबा अंधारी आणि ब्रम्हपुरी वडसा ठिकाणाहून दोन वाघिणींना नावेगाव जंगलात सोडण्यात आलं आहे."
 
वनविभागाची मोहीम
वन विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत ताडोबा आणि 33 वाघांना जेरबंद करण्याचे आदेश वनविभागाकडून देण्यात आले होते. पैकी गेल्या चार वर्षात 21 वाघ जेरबंद करण्यात आलं आहे. जेरबंद करण्यात आलेले 21 वाघ विविध ट्रान्झिट सेंटर आणि बंदिस्त पार्कमध्ये कोंडले गेले आहेत.
 
महाराष्ट्रातल्या संजय गांधी नॅशनल पार्क आणि गोरेवाडा ट्रान्झिट सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाघ आहेत.
 
वाघांच्या हल्ल्यात गेल्या चार वर्षात 104 जणांना आपला जीव गमावला आहे.
 
वाघांची संख्या वाढत असताना वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे.
 
गेल्या सहा वर्षांत 129 वाघांचा मृत्यू झाला आहे. यात 23 वाघांची शिकार झाली असून अपघातात 10, तर इलेक्ट्रिक शॉक लागून 18 वाघांचा मृत्यू झाला आहे, अशी अधिकृत आकडेवारी सांगते.
 
वाघांच्या नियोजनाचे काय?
वाढत्या वाघांचं नियोजन कसं करावं हे नवाब शाफत अली खान यांना बीबीसीने विचारलं. शाफत अली खान हे नरभक्षक वाघ जेरबंद करण्याच्या वन विभागाच्या अनेक मोहिमेत सहभागी झाले आहेत.
 
नवाब यांच्या मते एका वाघाला साधारण 15 ते 100 चौरस किलोमीटरचं क्षेत्र लागतं. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प – 1727.59 चौरस किलोमीटरवर पसरला आहे. हे क्षेत्र एकूण वाघांच्या संख्येसाठी कमी असल्याचं नवाब यांचं म्हणणं आहे.
 
1972 मध्ये जेव्हा 'प्रोजेक्ट टायगर' सुरू झाला, तेव्हा वाघांच्या संख्या वाढवण्यासाठी काम सुरु झालं. मात्र, वाढत्या वाघांच्या अन्नासाठी काय करायला पाहिजे त्याचं काहीच नियोजन नव्हतं.
 
जेव्हा 'प्रोजेक्ट टायगर' यशस्वी झाला, तेव्हा वाघांची संख्या 1200 हून 3000 पर्यंत पोहोचली. या वाघांसाठी जंगलात खाण्यासाठी काहीच नाही. वाघाच्या संचारासाठी जंगल कमी पडत चालल्याने मानव- वन्यजीव संघर्ष वाढला असल्याचं नवाब शाफत अली खान सांगतात.
 
वाघ सात-आठ दिवसात एकदा शिकार करतो. ताडोबात जर 130 वाघ असतील तर वाघांच्या खाण्याचा प्रश्न बिकट आहे. यावर वन विभाग नवीन फॉरेस्ट तयार करत आहेत. मात्र, वनावर अवलंबून असणाऱ्या माणसांचं काय? असा सवाल नवाब यांचा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती