कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होण्याचा अंदाज- राजेश टोपे
शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (10:15 IST)
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (26 ऑगस्ट) राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली.या बैठकीनंतर राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते, दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक बाधित झाले होते. आता तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होतील असा अंदाज असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं.
केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबद्दल बोलताना टोपे यांनी म्हटलं की,केरळमध्ये जी परिस्थिती आहे, त्याबद्दल केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.ओणम सणामुळे तिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.दुसऱ्या लाटेचा अनुभव घेऊन सरकार तयारी करत असल्याचं टोपे यांनी म्हटलं.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील अनेक रिक्त जागा 100 टक्के भरत आहोत. तिसऱ्या लाटेसाठी आर्थिक तरतूद केली आहे तसंच एशियन बँकेकडे 5 हजार कोटींच्या कर्जाचीही मागणी केली आहे, असं राजेश टोपेंनी म्हटलं.
राज्यातील ऑक्सिजन प्लान्टच्या संख्येत वाढ करत आहोत. एक हजार अँब्युलन्स खरेदी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर ॲम्ब्युलन्स असतील,अशी माहितीही टोपेंनी दिली.
राज्यातील 71 हजार आशा सेविकांना 1500 रुपये वाढीव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गट प्रवर्तकांना 1700 रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं.
मुंबईतील एका अनाथालयात 22 मुलांना कोरोना संसर्ग
मुंबईतल्या सेंट जोसेफ अनाथालयातल्या 22 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील काही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "दाखल करण्यात आलेली सर्व मुलं अनाथालयमधली मुलं आहेत. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. काही मुलांना ताप आहे. ही मुलं अंडर ऑब्झर्वेशन आहेत."