एटीएमचा कॅमेरा काढून एटीएम फोडणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (15:30 IST)
एटीएम सेंटर मधील सीसीटीव्ही कॅमेरा काढून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना धावडेवस्ती, भोसरी येथील ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडली.
 
रामदास मच्छिंद्र हानपुडे (वय 33, रा. महाळुंगे, चाकण, ता. खेड, मूळ रा. गौंडरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रवीण अशोक शिंदे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर धावडेवस्ती येथे नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये आरोपीने चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरी करण्यापूर्वी त्याने तेथील सीसीटीव्ही कॅमेरा काढून तोडून नुकसान केले. तसेच तोडलेला कॅमेरा चोरट्याने डस्टबिनमध्ये टाकून दिला.
 
त्यानंतर एटीएमचा पत्रा उचकटून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरू असतानाच याबाबत बँकेच्या नियंत्रण कक्षाला ‘अलर्ट’ मिळाला. त्यामुळे बँकेकडून तात्काळ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पकडले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती