शिर्डीतील साई बाबा मंदिर 7 ऑक्टोबरपासून दर्शनासाठी खुले होणार, दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (17:00 IST)
शिर्डी (अहमदनगर) - 7 ऑक्टोबरपासून साई मंदिर भक्तांसाठी खुले होणार आहे. या पार्श्वभूमीवर साई संस्थानकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
राज्य शासनाने दिनांक 7 ऑक्टोबर 2021 पासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज 15 हजार भाविकांना प्रवेशन दिला जाणार आहे.
यांना प्रवेश नाही
10 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, 65 वर्षावरील व आजारी व्यक्ती तसेच मास्क न वापरणाऱ्या साईभक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
असा मिळेल प्रवेश
5 हजार भक्तांना ऑनलाईन नोंदणीद्वारे, 5 हजार भक्तांना सशुल्क पासद्वारे तर 5 हजार भक्तांना ऑफलाईन पद्धतीने मोफत दर्शन मिळणार आहे. दर तासाला दीड हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिणार आहे. साईभक्तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन दर्शन पासेची बुकींग करावी लागेल.
साईबाबांची काकड आरती, मध्यान्ह आरती, सायंआरती आणि शेजारतीला 80 भाविकांना सशुल्क प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक आरतीला 10 गावकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
अशी असेल पासेसची प्रक्रिया
सकाळी 5 ते रात्री 10 यावेळेत संस्थानचे साई आश्रम 1, साईबाबा भक्तनिवास्थान (500 रुम), व्दारावती भक्तनिवासस्थान, श्रीराम पार्कींग, साई कॉम्प्लेक्स व शिर्डी बसस्थानक येथील दर्शन पास काऊंटरवरुन दिले जातील. तसेच प्रत्येक आरतीकरीता एकूण 80 साईभक्तांना आरतीसाठी प्रवेश देण्यात येईल. त्यापैकी प्रत्येक आरतीला प्रथम येणाऱ्या शिर्डी ग्रामस्थांना 10 पासेस देण्यात येतील. ऑनलाइनव्दारे 20 आरती पासेस, महत्वाचे व अतिमहत्वाचे मान्यवर आणि देणगीदार साईभक्तांकरीता 50 आरती पासेस दिले जातील. सशुल्क दर्शन पासेस गेट नंबर 1 शेजारील दर्शनरांगेतील पास वितरण काऊंटरवरुन दिले जातील.
'या' नियमांचे पालन करणे अनिवार्य
सर्व साईभक्तांनी दर्शनाकरीता जाताना मास्कचा वापर करावा.
सामाजिक अंतराचे 6 फुट अंतर ठेवावे.
मार्कींग प्रमाणे पालन करावे.
मंदिरात फुले, हार व इतर पूजेचे साहित्य नेण्यास मनाई आहे.
गर्दी टाळण्याकरीता सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारची नित्याची पालखी बंद राहील.
मंदिरातील साई सत्यव्रत पुजा, अभिषेक पुजा, ध्यान मंदिर व पारायण हॉल बंद राहतील.
दर्शनासाठी भाविकांना गेट नंबर 2 मधून प्रवेश दिला जाणार आहे.
व्दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधून दर्शन घेऊन गुरुस्थान मंदिर मार्गे 4 व 5 नंबर गेटव्दारे बाहेर पाठविले जाईल.
यासह सर्व कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.