पुण्यात जालन्यातील टोळीला पोलिसांनी पकडले

सोमवार, 18 जुलै 2022 (22:05 IST)
जालना जिल्ह्यातील दोन आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेने त्यांच्या 5 मोटारसायकल व 4 मोबाईल असा एकूण 8 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहीती घेत गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार जालना शहर हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहीती घेत असताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, संदेश पाटोळे याने त्याच्या साथीदारासह अनेक महागड्या गाड्या चोरल्या असून तो त्या गाड्या विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधत आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून नूतन वसाहत परिसरातुन संदेश प्रभाकर पाटोळे (रा. शिराळा, ता. जाफराबाद जि. जालना ह.मु. नुतन वसाहत) याला ताब्यात घेतले.
 
त्याला त्याच्याकडील केटीएम मोटार सायकल विषयी चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार सुरज राजु कसबे, (रा.म्हाडा कॉलनी, टी.व्ही सेंटर) यांच्या सोबत दोन दिवसांपुर्वी पुणे येथील मोरे वस्तीमधून दोन केटीएम मोटारसायकली चोरल्या असल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड, पुणे येथून यापुर्वी देखील आणखी दोन केटीएम मोटारसायकली व जालना येथून एक हिरो होन्डा कंपनीची मोटारसायकल चोरी केली असल्याचे मान्य केले. तसेच पुणे येथुन अनेक मोबाईल देखील चोरलेले असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 4 केटीएम मोटारसायकली,एक हिरो होन्डा कंपनीची सीडी डॉन मोटारसायकल व 4 मोबाईल असा एकूण 8 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेने आरोपीची माहीती पिंपरी चिंचवड, पुणे येथील अंमलदार यांना दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती