निफाड येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर केवळ पावसाच्या गळतीमुळे बंद असल्याने येथील रुग्णालय रुग्णांसाठी केवळ शोभेची बाहुली ठरली आहे. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर तात्काळ चालू करून रुग्णांची गैरसोय दूर करावी. तसेच रिक्त जागाही तात्काळ भराव्यात अशी मागणी लासलगाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली आहे
लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाच वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून रुग्णांसाठी रुग्णालयात ऑपरेशन थिएटर सुरू केले होते. मात्र सद्यस्थितीत पावसाच्या गळतीमुळे हे ऑपरेशन थिएटर तब्बल दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, प्रोस्कोपीक शस्त्रक्रिया, सिजर, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, गर्भपात इत्यादी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. ज्या रुग्णांना तात्काळ शस्त्रक्रिया गरजेची आहे ,अशा गरजू रुग्णांना नाइलाजाने खाजगी दवाखान्यात महागडे उपचार घ्यावे लागत असल्याने रुग्णांची आर्थिक कुचंबना सुरू आहे. त्यामुळे केवळ ऑपरेशन थिएटर बंद असल्याने या ठिकाणी स्रीरोगतज्ञ आणि भूलतज्ञ असून देखील उपयोग नाही.
तसेच या रुग्णालयात एक्स-रे मशीन उपलब्ध आहे, परंतु तंत्रज्ञ नाही. त्यामुळे हे रुग्णालय असून अडचण नसुन खोळंबा ठरत असल्याने परिसरातील रुग्णांनी मोठा मनस्ताप व्यक्त केला आहे. लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून निफाड तालुक्यातील मोठे शहर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक ये जा करतात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह बाहेरील रुग्णांची ही गैरसोय होत असल्याने रुग्णांना निफाड, पिंपळगाव बसवंत ,नाशिक अशा दूरवरच्या दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावे लागत आहे. त्यामुळे तात्काळ ऑपरेशन थिएटर चालू करून येथील रिक्त पदे भरावी अशा मागणीचे निवेदन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांना पाठविले असून शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, निवृत्ती जगताप ,बाळासाहेब जगताप ,प्रमोद पाटील, या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे निवेदनाच्या संचालक, आरोग्य भवन मुंबई, उपसंचालक, नाशिक मंडळ नाशिक ,जिल्हाशल्य चिकित्सक नाशिक यांना देखील पाठवलेल्या आहे.