निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचे ठरले होते : फडणवीस

शनिवार, 23 जुलै 2022 (21:15 IST)
अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी षडयंत्र रचले गेले होते. निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र येण्याचे ठरले होते. फक्त त्यांना ‘नंबर गेम’ची प्रतीक्षा होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.पनवेल येथे प्रदेश भाजपा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
 
राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे आधीच ठरले होत. त्यामुळे निकाल लागल्यानंतर त्यांनी, ‘आम्हाला सर्व मार्ग खुले आहेत,’ असे वक्तव्य केले होते. तरीही, मी फोन करत होतो; मात्र, ते फोन घेत नव्हते, अशी त्यावेळची वस्तुस्थिती फडणवीसांनी मांडली.
 
शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली. युतीच्या काळात आपण शिवसेनेविरोधातील बंडखोर उमेदवार मागे घेतले. पण आमच्या जागा पाडण्यात आल्या, असा आरोप फडणवीस यांनी केला. लोकांनी युतीला जनमत दिले असतानाही त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन केली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विपरित अशी शिवसेनेने भूमिका घेतली. तशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेकडे आता अल्प आमदार आहेत. आपल्यासोबत आहे ती खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारी शिवसेना आहे, असे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती