बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन 10 कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली, तसेच रू. 8 कोटीची बनावट विक्री देयके दिली असल्याचे आढळून आले. या 18 कोटींच्या करचोरी प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यास अटक करण्यात आली असल्याची माहिती, अन्वेषण विभागाचे राज्यकर सह-आयुक्त यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
खोटी देयके देऊन तसेच कोणत्याही वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता, खोटे व्यवहार, विवरणपत्रात नमूद करून करचोरी करणाऱ्या तसेच पुढील खरेदीदार व्यापाऱ्यांना खोटी कर वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) हस्तांतरित करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणे व अशा व्यवहारास प्रतिबंध घालण्याच्या सदर मोहिमे अंतर्गत सन 2022- 23 मधील आतापर्यंतची ही59 वी अटक आहे.
सदर प्रकरणात सहाय्यक राज्यकर आयुक्त, मुंबई अन्वेषण ड ०४४, प्रशांत खराडे यांनी ही धडक कारवाई केली व या प्रकरणी अटकेची कारवाई करण्यासाठी त्यांना सहाय्यक राज्यकर आयुक्त, श्रीकांत पवार, विद्याधर जगताप, सुमेधकुमार गायकवाड आणि राज्यकर निरिक्षक व कर सहायक यांनी मदत केली. सदर मोहिम, राज्यकर सह-आयुक्त, अन्वेषण-क विभाग, मुंबई अनिल भंडारी (भा.प्र.से.) व राज्यकर उपायुक्त, अन्वेषण- क विभाग, मुंबई मोहन प्र. चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.