दोन्ही गटातील नेत्यांकडून जोरदार आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे आणि ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी उभे राहता येऊ नये म्हणून त्यांचा राजीनामा न स्वीकारण्यासाठी पालिका प्रशासनावर दबाव टाकला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
शिंदे गटाच्या या कथित प्रयत्नानंतर लटके नेमकं कोणत्या गटाकडून निवडणूक लढवणार असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच, पालिकेने कमर्चारीपदाचा राजीनामा मंजूर करावा यासाठी ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे याबाबतचे गूढ आणखी वाढले आहे. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय नेते मंडळींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करत, शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे म्हणतात “उत्तम गोलंदाजी करून सचिन तेंडुलकरला बाद करणे ही खिलाडूवृत्ती. मात्र तो मैदानातच येऊ नये म्हणून त्याची बॅट आणि बूट लपवून ठेवण्याच्या या प्रकाराला पोरकटपणा, रडीचा डाव म्हणतात. अंधेरी जागेप्रकरणी मिंधे गट हाच रडीचा डाव खेळतो आहे. पण शिवसेनाच लढणार आणि जिंकणारच!”.