भारतीय हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, कोकणात जोरदार पावसाचा इशारा दिला

सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (14:32 IST)
सध्या राज्यात कमी दाब क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय झाल्यामुळे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे रविवारी नव्याने कमी दाब क्षेत्रांची निर्मिती झाली.या मुळे पश्चिम बंगाल, ओडिसा कडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

आज कोकण घाटमाथ्यासह राज्यात पावसाची दमदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे, रत्नागिरी, नंदुरबार, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

उर्वरित उत्तर महाराष्ट्र, कोकण भागात जोरदार मेघसरी बरसणार आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानसह ऊन-सावली असून पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं केली आहे. 

हवामान विभागाने पालघर धुळे, मुंबई, जळगाव जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम आणि नागपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. 
Edited by - Priya Dixit   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती