दारू पिऊन नेहमी घरात शिवीगाळ करणे, मारहाण करणे, असे प्रकार करत असल्यामुळे मुलांनी व घरच्या मंडळींनी जाब विचारला. दारू का पीता? दारू पिल्यानंतर शिवीगाळ का करता? याबद्दल साऱ्यांनीच वडिलाला धारेवर धरले. भांडण झाल्यामुळे घरात जेवणदेखील करण्यात आले नाही. त्यामुळे मुलगा जेवण आणण्यासाठी बाहेर गेला असता जेवण घेऊन मुलगा घरी येत असताना त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जीवे मारणाऱ्या वडिलाला न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
शिवाप्पा गंगाप्पा मुदकवी (वय 58) रा. सालापूर, ता. रामदुर्ग असे अकरावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपीचे नाव आहे. गुऊवारी त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. शिवाप्पाला 2 मुलगे होते. याचबरोबर सुना, नातवंडेदेखील आहेत. दि. 26 मार्च 2018 रोजी शिवाप्पा हा मद्य पिऊन आला होता. त्यावेळी मुलांना, पत्नीला शिवीगाळ करीत होता. वारंवार शिवीगाळ करत असल्यामुळे मयत मुलगा गंगाधर (वय 22) याने वडील शिवाप्पाला दारू पिऊ नका, अन्यथा तुमचा खून करू, अशी धमकी दिली.
दुसरा मुलगा विठ्ठल यानेही वडिलांना समजाविण्याचा प्रयत्न केला. रात्री 1.30 पर्यंत या सर्वांमध्ये भांडण सुरू होते. त्यामुळे जेवणदेखील घरात करण्यात आले नाही. लहान मुले असल्यामुळे रात्री 1.30 वा. रामदूर्ग येथून जेवण आणण्यासाठी गंगाधर गेला होता. गंगाधर जेवण घेऊन येत असताना आरोपी शिवाप्पा ट्रॅक्टर घेऊन त्याला शोधत होता. यावेळी दुचाकीवरच त्याने ट्रॅक्टर घातला. यामध्ये गंगाधर गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.