राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेले वादग्रस्त विधान, भाजप नेत्यांकडून ठाकरे कुटुंबावर होणारी अश्लाघ्य टीका या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राजकीयदृष्ठ्या कमालीचे वादळी ठरणार आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद गेले वर्षभर रिक्त आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची तयारी आघाडीने केली आहे. मात्र, सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संबंध तणावाचे असल्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक ९ मार्चला व्हावी, असा प्रस्ताव सरकारने राजभवनला पाठवला आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे हिवाळी अधिवेशनाला अनुपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अधिवेशनात ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.