निफाड – तालुक्यातील सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पात्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह तिस-या दिवशी सापडला. सोमवारी बोटिंगचा सराव करताना हा विद्यार्थी पाण्यात बुडाला होता. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता त्याचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन पथकाला शोधण्यात यश आले आहे. रवींद्र बाळकृष्ण भोईर (२०) रा. चाटोरी असे पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव असून तो सायखेडा मविप्र महाविद्यालयात शिकत होता.
दुर्घटना ज्याठिकाणी घडली त्या ठिकाणी आज गोदावरी नदीत पुन्हा शोध कार्य सुरू असताना सायखेडा बाजूकडील गोदावरी नदी पात्रात हा मृतदेह आढळून आला. सलग तीन दिवसांपासून आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलीस आणि स्थानिक नागरिक या तरुणाचा शोध घेत होते, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सागर गडाख, सोमनाथ कोटमे, बाळू आंबेकर, मधुकर आवारे, संतोष लगड, विलास सूर्यवंशी, फकिरा धुळे, किरण भुरकुडे,केशव झुर्डे आदींचा या पथकात समावेश होता. यावेळी निफाडच्या प्रांतधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, मविप्र संचालक शिवा पाटील गडाख,सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय.कादरी व कर्मचारी व ग्रामस्थ घटनास्थळी हजर होते. या दुघटनेमुळे चाटोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत रवींद्र याच्या पश्चात आई, वडील, दिव्यांग भाऊ व बहीण असा परिवार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तो शिक्षण घेऊन कौटुंबिक उदरनिर्वाहास हातभार म्हणून शिक्षण घेत असताना मोलमजुरी करत होता, असे ग्रामस्थानी सांगितले.