राज्य शासनाने शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. यापूर्वी सरळसेवा भरती कंत्राटी पद्धतीनं भरण्याची जाहीरात सरकारनं काढली होती. आता तहसीलदार पदासाठीही कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यामुळं राज्य सरकारनं होतकरु तरुणांना पुन्हा एकदा झटका दिला आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं तहसीलदार पदाची जाहिरात काढली असून ही भरती कंत्राटीपद्धतीनं होणार आहे. या जाहिरातीनुसार, नायब तहसीलदार, कारकून पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्रशासनात येण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तहसीलदारपदासारखी जागा जर कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असेल तर आम्ही काय करायचं? असा सवाल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.