स्वाभिमानी ‘आत्मक्लेश जागर’ आंदोलन करणार

गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (11:02 IST)
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारला सुबुध्दी येऊ दे, या मागणीसाठी ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत रात्रभर ‘आत्मक्लेश जागर’ आंदोलन करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.
 
याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, “केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांवर तीन कृषी कायदे लादले आहेत. हे कायदे अन्यायी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. दिल्लीत ७ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देशभरातील शेतकरी कुडकुडीत बसले आहेत. तरीही केंद्र सरकार केवळ वेळकाढूची भूमिका घेत आहेत.
 
त्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जागर आंदोलन करण्यात येणार आहे. रात्री पिठलं-भाकरं खाऊन या आंदोलनाला सुरूवात केली जाणार आहे. रात्रभर भजन आणि किर्तन केलं जाणार आहे. केंद्र सरकारला सुबुध्दी दे व शेतकऱ्यांना न्याय मिळू दे या मागणीसाठी आत्मक्लेश जागर आंदोलन केले जाणार असून रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जागर होणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती