सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई, पक्षाच्या भूमिकेबद्दल तांबेंनी ट्वीट केलं म्हटलं...
सोमवार, 16 जानेवारी 2023 (11:00 IST)
सुधीर तांबे यांचं काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने AB फोर्म दिला तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही म्हणून पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर सुधीर तांबे यांनी एक ट्वीट केलं आहे.
आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे.
blockquote class="twitter-tweet">
माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.
चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारी अर्जाचा गोंधळ शेवटपर्यंत पाहिला मिळाला.
काँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.
काँग्रेसचा सत्यजित तांबेंना पाठिंना नसेल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं.
तांबे यांनी पक्षाची फसवणूक केली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती.
काँग्रेसने या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेस विजयी झाले होते. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यासाठी एबी फॉर्म दिला होता, पण त्यांनी अर्जच भरला नाही.
“आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती, की विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींची आणि काँग्रेसमधल्याच अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती.
"काँग्रेस पक्षाने मात्र डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही तांत्रिक अडचणींमुळे मला शेवटच्या क्षणी अपक्ष म्हणून अर्ज भरला,” असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं.
या सगळ्या नाट्यानंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“मी दोन अर्ज भरले. एक काँग्रेसकडून आणि एक अपक्ष म्हणून. परंतु माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे. काँग्रेसच्या विचारांवर मी काम केलं आहे.”
अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर आपण भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचं सत्यजित तांबेंनी म्हटलं.
“राजकीय विचारसरणी आणि राजकीय पक्षाच्या सीमांच्या पलिकडे जाऊन या निवडणुकीत सर्वांनी माझ्या पाठिशी राहावं ही माझी सर्वांना विनंती आहे. माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाचा कार्य़कर्ता म्हणून आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी मला मदत करावी अशी विनंती मी त्यांना करेन.”
भाजपचा अधिकृत उमेदवार नाही
महत्त्वाचं म्हणजे भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार दिलेला नाही. भाजपशी संबंधित धनंजय जाधव, धनराज विसपुते आणि शुभांगी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. पण पक्षानं शेवटपर्यंत एकालाही एबी फॉर्म दिलेला नाही.
विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीने शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. शुभांगी पाटील या भाजपच्याच कार्यकर्त्या होत्या. त्यांनाच आता महाविकास आघाडीने मैदानात उतरवल्याने चुरशीची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या जागेसाठी एकूण 13 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ रमेश काळे यांनी दिली आहे.
भाजप तांबेंना मदत करणार?
अर्ज दाखल केल्यानंतर आपण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांच्याशीसुद्धा पाठिंब्यासाठी चर्चा करू, असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे.
त्यावर “धनराज विसपुते, शुभांगी पाटील हे आमचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अर्ज भरले, पण त्यांनी आमच्याकडे एबी फॉर्म मागितले नाहीत. अजून कोणी पाठिंबा मागितला नाही. सत्यजित तांबेही अपक्ष आहेत, आमच्याही लोकांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे आता ही अपक्षांची लढाई आहे,” अशी सावध भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
सत्यजित तांबे अपक्ष म्हणून निवडून येणं भाजपसाठी फायद्याचं ठरेल, असं बीबीसीसाठी नाशिकमध्ये काम करणाऱ्या प्रविण ठाकरे यांना वाटतं. भाजप त्यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देण्याची चर्चा नाशिकमध्ये असल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे.