विरोधी पक्षनेते अजित पवार काल थोडक्यात बचावले आहेत. शनिवारी बारामती येथील एका रुग्णालयाचं उद्घाटन केल्यानंतर अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. या प्रकारानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून अजित पवारांसह त्यासोबत असलेल्या डॉक्टरांना बाहेर काढलं. शनिवारी घडलेल्या घटनेबाबत अजित पवारांनी आज खुलासा केला आहे.
रविवार एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी लिफ्टमध्ये घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. संबंधित कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, “मला अकरा वाजेपर्यंत मुंबईत पोहोचायचं आहे. रात्री प्रवास केल्यानंतर कसे अपघात होतात? हे आपण पाहत आहोत. काल माझीही लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. याबद्दल काल मी कुठे बोललो नाही. तुम्ही घरचे आहात म्हणून बोलतोय.
“काल बारामतीत मी एका रुग्णालयाचं उद्घाटन केलं. यावेळी लिफ्टमध्ये शिरल्यानंतर शिफ्ट बंद पडली. लिफ्ट वर जात नव्हती. तेवढ्यात लाईट गेली. लिफ्टमध्ये अंधार पडला आणि लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. खोटं नाही सांगत पण आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता. सुरक्षारक्षकांनी दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढलं. याबद्दल मी कुणालाच बोललो नाही. परमेश्वराची कृपा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी बचावलो,” असा खुलासा अजित पवारांनी केला.