मुलींच्या रॅगिंगमुळे शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; खून झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (13:20 IST)
नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर स्वप्नील शिंदे असे या डॉक्टरचे नाव असून तो गायनॅकॉलॉजीच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणार्‍यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.
 
स्वप्नील महारु शिंदे (वय २६) मंगळवारी सुमारे ७.३० वाजता मेडिकल कॉलेज येथील ऑपरेशन थिएटरच्या बाजूस असलेल्या वॉशरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यावर उपचार सुरू होते. स्वप्नील यास रात्री सुमारे १०.३० चे सुमारास मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद आडगाव पोलिस ठाण्यात दाखल आहे.
 
कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे. याबाबत कॉलेच्या प्राचार्या मृणाल पाटील यांनी सांगितले की, मयत झालेल्या विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरू होते. रॅगिंग होत असल्याबाबतची कोणीतीही तक्रार स्वप्नील किंवा त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आली नव्हती. याप्रकरणी यापूर्वीही त्याच्या पालकांना बोलावण्यात आले होते. फेब्रुवारीपासून तो बीड येथील त्याच्या घरी होता. जूनमध्ये तो कॉलेजला परतल्यानंतर त्याच्या आईला त्याच्यासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याची आई त्याच्यासोबत येथेच राहत होती मात्र त्यांनीही आपल्याकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे प्राचार्या पाटील यांनी सांगितले.
 
सुत्रांच्या माहितीनुसार कॉलेजमधील काही मुली त्याला मुद्दाम त्रास देत होत्या. त्याचा वारंवार मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केला आहे. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणार्‍यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. 
 
पोलीसांकडून याबाबत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. रॅगिंग प्रकरणातून स्वप्नीलचा घातपात झाल्याचा कुटुंबियांकडून आरोप करण्यात केला आहे. याप्रकरणी दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती