लष्करी ऑपरेशन करताना साताऱ्याच्या 23 वर्षीय जवान सुरज शेळके यांना वीरमरण

शनिवार, 25 जून 2022 (12:12 IST)
लेहमध्ये लष्करी ऑपरेशनदरम्यान साताऱ्याचा जवान शहीद

सातारा- जम्मू-काश्मीरच्या लेहमध्ये साताऱ्याचे जवान सुरज शेळके यांना वीरमरण आलं आहे. लष्कराचं 'ऑपरेशन रक्षक' (Operation rakshak) सुरु असताना जवान सुरज शेळके शहीद झाले आहेत.
 
 सातारा जिल्ह्यातील खटाव गावचे ते सुपूत्र असून त्यांच्या जाण्यानं खटावसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. शहीद जवान सुरज प्रताप शेळके 3 वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पहिलंच पोस्टींग लेह लडाखला झालं होतं. येथेच सेवा बजावत असताना लष्कराच्या ऑपरेशन रक्षकदरम्यान वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि छोटा भाऊ असा परिवार आहे. 
 
साताऱ्यातील खटाव तालुक्याला सैनिकांची परंपरा आहे. या महिन्याभरात खटाव मधील तीन जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं. गेल्या महिन्यात लडाख प्रदेशात 26 सैनिकांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले होते. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांनाही वीरमरण आलं होतं.  22 मराठा लाईट इन्फण्ट्रीमध्ये ते सुभेदार होते.
 
त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला 11 जून रोजी खटाव तालुक्यातील भुरकवडीचे सुपुत्र जवान संग्राम फडतरे जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये शहीद झाले होते. सुभेदार विजय सर्जेराव शिंदे, संग्राम फडतरे आणि आता सुरज शेळके याच्या जाण्यानं खटावसह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती