शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले. याची सर्वत्र चर्चा सुरु असताना लोकप्रिय किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी देखील आपल्या खास शैलीत किर्तनाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. इंदोरीकर महाराज यांनी किर्तनाच्या माध्यमातून राजकीय घटामोडीवर जोरदार फटकेबाजी केली.
चाळीसगावमध्ये भाजपचे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी इंदोरीकर महाराज म्हणाले की आज जे सुरु ते पंचांगने सांगितले होते. कुणाला आमदार म्हणावे हेच कळत नाही आणि यांच्यामुळे तुकोबांच्या पालखीची बातमी दिसत नाहीये. माऊलींची पालखी, पावसाची बातमी, शेतकऱ्यांना बियाणं भेटत नाही पण कुणालाच काही फरक पडत नाही. कुणीही याची दखल घेत नसून सध्याची फक्त एकच ब्रेकिंग न्यूज 'मीटिंग सुरू'...लोकच बधीर झाले आहेत, तुम्हाला झालं काय नेमकं? असा सवाल इंदोरीकर महाराजांनी उपस्थितीत केला.
त्यांनी म्हटले की फक्त लोभ नावासाठी अख्खी मंडळी एकत्र आली. शिका त्यांच्याकडून कारण आता कुणी म्हणेल का हे विरोधक आहे का? तुम्ही नुसते दात कोरा कारण तुमची तर किंमत संपली. तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा आणि सतरंज्या झटका आणि मरा, तुम्हाला अशी लाज वगैरे नाही का? असं म्हणत इंदोरीकर महाराज यांनी कार्यकर्त्यांचेही कान उपटले.