दि. 19 एप्रिल 2020 पासून सुरू असलेल्या विश्वमांगल्य सभेच्या ऑनलाइन "विश्वमांगल्य व्यासपीठ" या व्याख्यानमालेत 27 एप्रिल रोजी माजी लोकसभा अध्यक्षा मा. सुमित्राताई महाजन यांचे "धर्म आणि राष्ट्राच्या उत्थानाकरिता परिवार संस्थेची भूमिका" या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी "धर्म म्हणजे कर्तव्य" आणि "मनुष्य धर्म म्हणजे सतत कल्याण करणे" हे सविस्तर रित्या समजविले.
स्वतःची प्रगती ही नेहमीच समाजाला सोबत घेऊन होते म्हणजेच "I am because We are" ही संकल्पना स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की "धर्म म्हणजे एक जीवनपद्धती आहे". पुढे त्या म्हणाल्या की जर देवाने आम्हाला संवेदना दिली आहे तर ती सहसंवेदनेत कशी परिवर्तित करता येईल या बाबतीत प्रत्येकाने विचार करायला हवा. पुढे त्यांनी एक निष्ठावंत कार्यकर्ता निर्मिती करिता आणि व्यक्तिमत्त्व विकासाकरिता(personality development) परिवारातील संस्कार हे आयुष्यभर व्यक्तीला साथ देत असतात, हे अत्यंत सोप्या भाषेत सांगितले.
चरित्र निर्माण (character building) हे केवळ परिवारातूनच होऊ शकते, हे त्यांनी आवर्जून सांगितले. "वसुधैव कुटुंबकम्" ही संकल्पनेला सर्वप्रथम आम्ही घरातूनच सुरुवात करायला हवी म्हणजे आमचे प्रत्येक राष्ट्रकार्य हे सहजरीत्या पार पडेल. परिवार संस्थेचे महत्त्व सांगताना त्या म्हणाल्या की परिवारातून सुरुवात करून आमची भूमिका विस्तारित करत आम्ही त्याला विराट स्वरूप द्यायला हवे आणि हे विराट स्वरूपच राष्ट्र कल्याणामध्ये उपयोगी पडेल. घरातूनच समाज आणि नंतर राष्ट्राचे उत्थान आम्ही करू शकतो. प्रत्येक व्यक्ती निष्ठावंत होऊन जर आपले कर्तव्य पार पडेल तर देश सतत प्रगतीच करत राहील असेही त्यांनी सांगितले.