15 मुक कर्णबधिर चिमुकल्यांवर यशस्वी उपचार

शुक्रवार, 7 मे 2021 (08:31 IST)
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 15 मुक कर्णबधिरांची निवड करुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया व बोलता येण्यासाठी स्पीच थेरपीचा उपचार करुन त्यांना बोलता येण्यासह ऐकण्याच्या दृष्टिनेही समर्थ केले.
 
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य पथकामार्फत तपासणी केली जाते. या तपासणीतून गंभीर आजार असल्यास अथवा कुण्या बालकांमध्ये व्यंग असल्यास त्याचेही मोफत उपचार व शस्त्रक्रीया केल्या जातात. या उपक्रमातंर्गत वैद्यकीय पथकाकडून शोध घेतलेल्या 90 मुक कर्णबधीर बालकांची तपासणी व उपचाराबाबत जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  शिबिरात कान नाक घसा तज्ञ डॉ.सुधीर कदम व त्यांची टिम कडून तपासणी करून 
त्यामधून 30 बालकांची बेरा तपासणी केली असता 15 बालकांना कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रीया करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे निष्पण झाले होते. या 15 बालकांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. या 15 बालकांमध्ये नांदेडमधील 2, नायगाव मधील 4, लोहा 2, कंधार 1, किनवट 2, भोकर 1, हिमायतनगर 2, उमरी 1 या बालकांचा समावेश आहे.
 
शस्त्रक्रीया करण्यासाठी लागणार्‍या 78 लक्ष रुपये खर्चाची तरतुद आवश्यक होती. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे सदरील अनुदान उपलब्ध नव्हते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी आरोग्य कुटूंब कल्याण कार्यालय पुणे येथे पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतले.
 
मिरज येथे शस्त्रक्रिया : बालकांच्या शस्त्रक्रीया करण्यासाठी सांमजस्य करार करण्यात आलेल्या मिरज येथील यशश्री  हॉस्पिटलमध्ये बालकांची अत्यंत गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रीया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रीया पार पाडण्यासाठी 78 लक्ष रुपये खर्च शासनाने केला. त्या बालकांचे बहिरेपण दूर झाले असुन पालकांनी निशुल्क वैद्यकीय सेवेबाबत समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील कार्यरत राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, वैद्यकीय आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व 
एएनएम यांनी कोरोना  काळात सुद्धा बालकांच्या पालकांचे यशस्वी समुपदेशन करून शस्त्रक्रीया केल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती