विकासासाठी स्टार्टअप कॅपिटल इंडस्ट्री हब उभारणार नाशिकचा विकास करणार: मुख्यमंत्री

मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला नाशिकची कनेक्टीव्हीटी देणार असून फक्त सव्वा तासात मुंबईला नाशिककरांना पोहचता येईल, डायपोर्टमुळे इंडस्ट्रीयल टाउनशिप उभी राहणार असल्याने मोठे उद्योग उभे राहणार आहेत. तर येत्या काळात मोठया प्रमाणावरील फूड प्रोसेसिंगमुळे एक इलेक्ट्रीक केंद्र उभारून स्वस्त वीज दिली जाईल. यामुळे नाशिकचा विकास होणार आहे. स्टार्टअप कॅपिटल इंडस्ट्री हब उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
 
नाशिकच्या जनतेला परिवर्तन हवे असून जनतेचा आशिर्वाद मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान एचएएल या कंपनीला अजून 10-20 वर्षे कामे मिळत राहतील. याकरीता निवडणुकीनंतर संरक्षणमंत्री यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. काल रात्री गंगाघाटावर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आले असता बोलत होते. प्रारंभीच ते म्हणाले की, या निवडणुका वेगळया असून कोणाचे सरकार येणार, किती जागा येणार अशी पूर्वी असणारी उत्कंठा असायची आता मात्र असे दिसत नसल्याने शेंबडं पोरगं सांगेल की कोणाचे सरकार येणार असे त्यांनी सांगितले. राहूल गांधी, शरद पवार यांच्यावर त्यांनी टिका करीत त्यांच्या सरकारच्या 15 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा आम्ही केलेले 5 वर्षांचे काम हे मोठे असल्याने 15 पेक्षा 5 मोठा असे त्यांनी सांगितले.
 
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात तर चंद्रावर प्लॉट देतो आणि ताजमहाल बांधून देतो एवढेच आश्वासन बाकी आहे. कारण त्यांना माहित आहे की आपण तर काही निवडून येत नाही त्यामुळे त्यांनी तसा जाहीरनामा प्रसिद्ध केला अशी खिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडविली. पारदर्शक आणि प्रामाणिकतेतून काम केले. महिला, मजूर, कामगार, युवक, महिला यांच्यासह मराठा, धनगर, लिंगायत, आदिवासी आरक्षणाचे आपल्या सरकारने काम केले आहे. देशातील सर्वात मोठे उद्योग, रेल्वे, पोर्ट, पाण्याची योजना, पायाभूत सुविधा महाराष्ट्रात केल्या गेल्याचा अहवाल सांगतो. देशातील 100 टक्क्यांपैकी तब्बल 51 टक्के मोठे प्रोजेक्ट हे महाराष्ट्रात उभारले गेले असा दावाही त्यांनी केला. नाशिकमध्ये टायर बेस्ड मेट्रो परिवहन सेवा मंजूर केली असल्याची त्यांनी आठवण करून दिली. तसेच स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा, सी-वेज योजना, नमामी गोदा योजना, एलईडी लाईट, सीसीटीव्ही, एसटी स्टँड, सेंट्रल पार्क, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आदी कामे नाशकात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती