St Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अद्याप सुरू असून आज या संपाला एक महिना पूर्ण झाला. प्रशासनानं दिलेल्या पगारवाढीच्या आश्वासनानंतरही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. 8 नोव्हेंबरला संपूर्ण राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि विलीनीकरण या दोन मुख्य मागण्यांसाठी एल्गार पुकारला. एसटी कर्मचाऱ्यांचा इतिहासातील पहिलाच दीर्घकालीन संप असल्याचं बोललं जातंय. एस.टी. महामंडळाच्या 61 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासातील इतके दिवस चालणारं हे विक्रमी आंदोलन ठरलं आहे. आधीच तोट्यात असणाऱ्या महामंडळाला आंदोलनामुळे थोडा थोडका नाहीतर तब्बल 450 कोटींहून अधिक फटका बसला.
आतापर्यंत एस.टी.च्या कर्मचार्यांचे चार संप झाले. त्यामध्ये 1972 साली पहिला संप झाला, तो 17 दिवस होता. त्यानंतर 2015 साली 2 दिवस, 2017 साली 6 दिवस, 2018 साली 2 दिवस व सध्या गेले 30 दिवस संप सुरू आहे. एस.टी.च्या इतिहासात प्रथमच एवढे दिवस संप सुरू आहे.
8 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आणि अघोषित काम बंद आंदोलन सुरु झालं. राज्यभरातील सर्वच एसटी डेपोमधील एसट्यांची चाकं थांबली. वेतनवाढ आणि विलीनीकरण या दोन प्रमुख मागण्यांवर कर्मचारी ठाम होते. त्यासाठी सरकारसोबत बैठकांच्या फैरी जडल्या. संपूर्ण राज्यभरातून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. तसेच विरोधकांनीही एसटी संपाच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं. अखेर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. गेल्या एक महिन्यापासून अनेक टप्प्यांमधून हे आंदोलन गेलं.