गेल्या वर्षभरापासून लसीकरण मोहीम सुरू असली, तरी अद्याप शहरातील पावणेदोन लाख नागरिक असे आहेत, की ते लस घेण्यासाठी आरोग्य केंद्राची पायरीदेखील चढले नाहीत.
पहिल्या लाटेत शहरात ७६ हजार नागरिक कोरोनामुळे बाधित झाले होते. एक हजारापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेत दीड लाखाहून अधिक नागरिक बाधित झाले व तीन हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेला. शहरात आतापर्यंत चार हजार ११ नागरिकांचा बळी गेला आहे. महापालिका हद्दीत २६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. महापालिकेने १८ वर्षांवरील १३ लाख ६३ हजार नागरिक लसीकरणासाठी निश्चिूत केले होते. त्यांपैकी गेल्या ११ महिन्यांत ११ लाख ८७ हजार नागरिकांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. शहरात पावणेदोन लाख नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही.
लसीकरणाचे डोस उपलब्ध होत नव्हते, त्या वेळी नागरिक पहाटेपासून केंद्रांवर गर्दी करत होते. आता मात्र मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होऊ लागली असताना नागरिकांनी लस घेण्याकडे पाठ फिरविली. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ११ लाख ८७ हजार, तर दुसरा डोस घेतलेले सात लाख ४८ हजार नागरिक आहेत. ९७ हजार लसवंत नागरिक असे आहेत, ज्यांनी पहिला डोस घेतला; परंतु दुसऱ्या डोसची ८४ दिवसांची मुदत उलटूनही अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही. दोन्ही डोस घेतलेले ५५ टक्के नागरिक आहेत.