एस.टी संपः गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी

शनिवार, 9 एप्रिल 2022 (19:09 IST)
एस. टी. कर्मचाऱ्यांनी काल (8 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर चालून जात आंदोलन केल्यानंतर या आंदोलकांना आझाद मैदानातून हटवण्यात आलंय. या आंदोलकांनी आता जवळच्याच CSMT स्थानकात ठिय्या आंदोलन सुरू केलंय.
 
एस. टी. कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी अटक केली, आज गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोली कोठडी सुनावण्यात आली आहे. 109 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या आंदोलकांना न्यायालयाने आता जामीन नाकारला आहे.
 
अॅड. सदावर्ते यांनी आपल्या पोलीस कोठडीच्या काळात आपल्याला लागणारी औषधे मिळावीत अशी विनंती केली आहे.
 
सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. "एसटी कर्मचाऱ्यांनी आता सहकार्याची भूमिका घ्यावी. झालेल्या प्रकाराचा आम्ही सखोल तपास करत आहोत. शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचं सुरक्षा वाढवण्यात आल्ययाचं त्यांनी सांगितलं."
 
एस. टी. आंदोलकांना आझाद मैदानात बसण्यास मनाई करण्यात आलीय. पण आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका एस. टी. कर्मचाऱ्यांनी घेतलीय.
 
आंदोलन कर्मचाऱ्यांनी CSMT (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)मध्ये ठिय्या मांडल्याने तिथे आज मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
 
पोलिसांनी पहाटे आपल्याला आझाद मैदानातून हुसकावल्याचं स्टेशनमध्ये बसलेल्या आंदोलकांचं म्हणणं आहे. तर काल शरद पवारांच्या घरावर चालून जाणारे हे आपल्यातले एस.टी. कर्मचारी नव्हते, आंदोलनाला जाणूनबुजून हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं तिथेच बसलेल्या एस.टी. कर्मचारी महिलेने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
एसटी कर्मचाऱ्यांनी काल (शुक्रवार 8 एप्रिल ) शरद पवारांच्या मुंबईतल्या घरात घुसून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळ त्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकसुद्धा केली.
या प्रकरणी पोलिसांनी एसटी आंदोलकांचे नेते अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
 
या प्रकारानंतर त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मीडियाशी बोलताना केला होता.
जयश्री पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय, "गुणरत्न सदावर्तेंच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. शरद पवारांची दादागिरी खपवून घेतली जाणार आहे. त्यांना न्यायालयही माफ करणार नाही. आम्ही घाबरत नाही."
 
तर, "मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी या आंदोलनानंतर दिली आहे.
"टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा आणि माझ्या पक्षाचा घनिष्ठ संबंध आहेत. गेले 40-50 वर्षं त्यांचं एकही आधिवेशन मी चुकवलेलं नाही. निर्माण झालेले प्रश्न सर्वांच्या सहकार्याने सोडवले. याच वेळेला त्यांना एक चुकीचा रस्ता दाखवला गेला. त्याचीच प्रतिक्रिया आज इथं दिसली.
 
"आंदोलन चिघळल्यामुळे काही लोकांना आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागला. आंदोलन चिघळवणारं नेतृत्व त्याला जबाबदार आहे. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी या ठिकाणी टार्गेट करण्याचा निर्णय घेतला," असं शरद पवार म्हणाले आहेत.
 
तर शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय असून या कृत्यामागे कोण आहेत ते शोधून कडक कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
 
एसटी कर्मचारी मोठ्या संख्येनं शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर जमले होते. त्यातील काही कर्मचारी सुरक्षारक्षकांना ढकलून बंगल्याच्या आवारात घुसले होते.
 
त्यानंतर सुप्रिया सुळे निवास्थानाबाहेर आल्या होत्या. "आंदोलकांना बोलायचं असेल तर माझी ऐकायची तयारी आहे," असं त्या म्हणाल्या. "मी सर्वांना हात जोडून विनंती करते," असंही त्या म्हणाल्या.
 
मी तातडीने चर्चा करायला तयार आहे, माझी सर्वांना शांततेनं बसण्याची विनम्र विनंती आहे, असंही त्या म्हणाल्या.
 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही शरद पवारांच्या घराबाहेर जमले. त्यांनी शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
 
काही वेळानं सुप्रिया सुळे पुन्हा घराबाहेर आल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "मी मुंबई पोलिसांचे आभार मानते. त्यांनी माझ्या आई-वडिलांसाठी जे केलं, त्यांचे मी आभार मानते. आजची घटना खूप दुर्दैवी आहे. शांततेच्या मार्गानं चर्चेला बसायची आमची तयारी आहे. माझ्या घरावर मोठा हल्ला झालेला आणि ही घटना दुर्दैवी आहे."
परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आणि सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले होते.
 
पोलिसांनी एक स्कूल व्हॅन आणली आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं. ते आंदोलकांना आझाद मैदानात घेऊन गेले.
 
या घटनेनंतर मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी "महाराष्ट्रात असं राजकारण कधी झालं नाही, हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जाईल," असं ते म्हणालेत.
 
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एसटी कर्मचारी अचानक शरद पवारांच्या बंगल्याबाहेर पोहोचले. तिथं त्यांनी 'शरद पवार, हाय हाय' अशा घोषणा दिल्या.
 
तसंच चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. सुप्रिया सुळे यांनीसुद्धा त्यांच्या घरावर दगडफेक झाल्याचं मान्य केलं आहे.
"शरद पवार हे जनतेचे सेवक आहेत. पण, आमच्या 120 आत्महत्या झाल्यात. तरीही हे बघायला तयार नाहीत. हेच का जाणते राजे? कोर्टाच्या निकालाची वाट सरकारला का पाहावी लागली? आमच्या 120 आत्महत्यांना शरद पवार, अजित पवार जबाबदार आहेत," असं एका आंदोलक कर्मचाऱ्यानं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं.
 
काही आंदोलकांनी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या.
 
"एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी आणि अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे," असं गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.
 
तर "पवार साहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून, आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी," अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
 
"ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.
 
"गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो," अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलय.
 
महाविकास आघाडी सरकार दगडाच्या काळजाचं - भाजपची टीका
याप्रकरणी भाष्य करताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, "120 मृत्यू होऊनही सरकारनं एसटीच्या मुद्द्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. अनिल परब, अजित पवार यांनी सातत्यानं कठोर भूमिका घेतली. राज्यकर्त्यांनी असं वागू नये. एसटी कर्मचाऱ्यांसमोर काहीच पर्याय उरला नाही. मग ते सरकारचे जे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्या घराबाहेर जमले. महाविकास आघाडी सरकार दगडाच्या काळजाचं आहे."
 
तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं, "अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आजचा हा प्रकार आहे. सरकारनं एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. तरीही कुठल्यातरी एका अज्ञात पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचं कृत्य घडावं यासाठी सातत्यानं हालचाली केल्या जात आहेत. महाविकास आघाडीचं सरकार काही लोकांच्या डोळ्यात खुपतं, ते लोक अशाप्रकारचे कृत्य करत आहेत."
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं, "महाराष्ट्रातल्या सर्वांत ज्येष्ठ नेत्याच्या राहत्या घरी असं जाणं म्हणजे लोकशाही काय वळण घेतेय? महाराष्ट्रातल्या राजकारणात असं कधीच घडलं नाही. हे थांबवलं पाहिजे."
 
शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी एसटी आंदोलनात सुरुवातीच्या काळात सहभागी नोंदवला आणि नेतृत्वही केलं.आजच्या घटनेविषयी बोलताना ते म्हणाले, "राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की, आमचं सरकार आलं तर एसटी महामंडळाचं विलीनीकरण करू. पण, राजकारण्यांनी जी शक्य आहेत तिच आश्वासनं दिली पाहिजेत, हा यातून धडा घ्यायला हवा."
 
हायकोर्टात गुरुवारी काय घडलं होतं?
कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई नको, अशी सूचना हायकोर्टाने केली.
 
एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत रुजू व्हावे.
 
एसटी कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी मिळावी.
 
बकरी आणि वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं.
 
प्रत्येक कर्मचाऱ्याला 300 रुपये प्रमाणे एकूण 30 हजार रुपये कोव्हिड भत्ता द्यावा.
 
प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे.
 
कर्मचारीही सारासार विवेकबुद्धीला पटणार नाही, असं वागले.
 
पण या कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी द्यायला हवी.
 
त्यांच्या उपजीविकेचं साधन त्यांच्याकडून हिरावून घेऊ नका, असं कोर्टाने म्हटलं आहे.
 
22 एप्रिलनंतर कामावर न येणाऱ्या ST कामगारांना कामाची गरज नाही असं समजू - अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यांवरील शिस्तभंगाची कारवाई मागे घेणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे जे कर्मचारी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही, असं परब यांनी म्हटलं.
 
जे कर्मचारी 22 एप्रिलनंतर कामावर परत येणार नाहीत, त्यांना कामाची आवश्यकता नाही, असं समजून कारवाई करु, असंही अनिल परबांनी म्हटलं.
 
कामगारांनी चुकीचा नेता निवडला आणि त्यांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कामगारांची असेल असं म्हणत अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड, गुणरत्न सदावर्तेंना टोला लगावला.
 
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनाचे सहा महिने
ऑक्टोबर महिना अखेरीस एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर बेमुदत संप सुरू केला. त्यानंतर राज्य सरकारने महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून वाढवून 28 टक्के केला.
 
घरभाडं भत्ता वाढवण्याचीही घोषणा करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांविषयी दिवाळीनंतर चर्चा करू असं परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी म्हटलं होतं.
 
पण एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करण्यात यावं यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेनं आंदोलन सुरू ठेवलंय.
 
अॅड. गुणरत्न सदावर्ते कोण आहेत?
गेल्या काही वर्षांपासून अॅड गुणवरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेला कायदेशीर लढा असो की सध्या सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी घेतलेली उडी असो. सदावर्ते यांनी अशा अनेक केसेस न्यायालयात लढल्या आहेत.
 
अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण ओरंगाबाद आणि मुंबईतून झालं आहे. विविध सामाजिक चळवळींमध्ये ते नेहमीच पुढे असायचे. त्यांनी नांदेडला 'सम्यक विद्यार्थी आंदोलन' ही संघटना सुरू करुन या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले होते.
 
पुढे सदावर्ते मुंबईत स्थायिक झाले आणि मुंबईत वकिली करू लागले. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी केली आहे. मॅटच्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले आहेत. ते बार कॉऊंसिलच्या शिखर परिषदेवर देखील होते.
 
मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका न्यायालयात दाखल करणाऱ्या अॅड. जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. त्यांना झेन नावाची मुलगी आहे.
 
22 ऑगस्ट 2018 रोजी परळच्या क्रिस्टल प्लाझा या इमारतीला आग लागली होती. त्यावेळी 10 वर्षाच्या झेन सदावर्ते हिने तिथे अडकलेल्या लोकांना सावधगिरीचे उपाय सुचवले. त्यामुळे 17 जणांचे प्राण वाचले होते. तिच्या या कार्याबद्दल तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.
 
केवळ मराठा आरक्षाणावरील याचिकाच नाही तर अंगणवाडी सेविकांमुळे मुलांची होणाऱ्या आबाळाची केस, ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस, मॅटच्या माध्यमातून चार हजार परिचारिकांना नोकरीत कायम करण्याची केस, हैद्राबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका अशा अनेक केसेस सदावर्ते यांनी लढवल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती