अंतिम इशारा! ST कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारने उचलले हे पाऊल

बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (21:12 IST)
दिवाळी सणातच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अद्यापही कायम आहे. सुमारे दहा-बारा दिवस उलटले तरी अद्यापही या संपावर तोडगा निघालेला नाही. परिणामी राज्यभरात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तर दुसरीकडे कामावर परत या, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार करताना दिसत आहेत. आता हा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला आहे.
 
राज्यभरात एसटीचे सुमारे एक हजार पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. आता उर्वरित सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी येत्या २४ तासात कामावर यावे. अन्यथा त्यांना सेवामुक्त करण्यात येईल, असा गंभीर इशाराच सरकारने दिला आहे. परंतु अद्यापही सुमारे एसटी महामंडळाचे सुमारे ९७ हजार कर्मचारी संपावर आहेत. कंत्राटी कर्मचाऱअयांच्या माध्यमातून एसटीची सेवा सुरू करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत.
 
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे आणि त्वरीत वेतन वाढ द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात दोन्ही बाजूच्या शिष्टमंडळांनी आपापली बाजू लावून धरल्याने मुंबई उच्च न्यायालयात यावर तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, हायकोर्टानं संपकरी संघटनांना राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीला हजर राहून आपली भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तर कामगार संघटनांनी या समितीवर आपला विश्वास नसून निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची भुमिका हायकोर्टात व्यक्त केली आहे.
 
या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, एसटी महामंडळामध्ये सध्याच्या सुमारे १४०० रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांनी कामावर यावे, अशी आमची अपेक्षा आहे, परंतु तेही अद्याप संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवणार आहोत. २४ तासांत ते कामावर येतात की नाही पाहिले जाईल. अन्यथा, पुढे काय कारवाई करायची याबाबत निर्णय घेतला जाईल.
 
खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सुमारे चार दिवसापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे, तसेच त्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार केला जाईल असे आश्वासन देखील दिले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसापुर्वी नाशिक दौऱ्यावर असताना म्हणाले की, सध्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती गंभीर आहे. एस टीचा संप सुरू आहे, त्यामुळे मागण्या योग्य असतील तरच सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करा तसेच मागण्यांमागची भावना समजून घ्यावी. त्याच वेळी मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका, असे आवाहन पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
 
रोजंदारीवर काम करणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कामगारांनी २४ तासांत कामावर हजर व्हावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असे या म्हटले आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने आतापर्यंत २ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. १६) एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. मंगळवारी विविध आगारातून संध्याकाळी सहापर्यंत सुमारे ७० बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती