महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच एक भयावह चित्र समोर आलं आहे. विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरच्या दिशेने निघालेल्या एसटी बसचं एक्सलेटरच पेडल तुटल्यानंतर चालक आणि कंडक्टरने दोरीचा वापर करत बस नाशिकपर्यंत आणली. कसारा घाटात एक्सलेटरच पेडल तुटलं त्यानंतर दोघांनी शक्कल लढवत चालक गाडी चालवत होता तर कंडक्टर दोरी हातात पकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता.
या घटनेचा भयावह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये चालक गाडी चालवत असून कंडक्टर दोरी हातात पकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा सर्व प्रकार पाहून बसमधील प्रवाशांचा संताप विकोपाला गेला. या धोकादायक प्रकारामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. काहींनी गोंधळ घालत धावत्या बसमधली हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. मेकॅनिकच्या साहाय्याने ही बस दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला गेला असता बस दुरुस्त झाली नाही तर याच प्रकारे दोरीच्या साहाय्याने गाडी कंट्रोल करत दुपारच्या सुमारास बस नाशिकला पोहोचली.