सध्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून भोपाळ येथे राहणाऱ्या महिलेचा फायदा घेत बांधकाम व्यावसायिक आणि तिच्या ओळखीच्या लोकांनी नाशिकमधील तिच्या फ्लॅटचे मुखत्यार बनावट पत्र बनवून घेत दुसऱ्याच महिलेला तीच मूळ मालक असल्याचे भासवून फ्लॅटवर सहा कोटींचे बँकेचे कर्ज काढून आर्थिक फसवणूक करीत मानसिक त्रास दिल्याचे उघड झाले आहे.
यातील संशयितांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, फिर्यादी बबली अमित सिंग ५२ रा. दुर्गेश रेसिडेन्सी, आनंदवल्ली, नाशिक ह. मु. भूमिका रेसिडेन्सी, श्रीपुरम, कोलार रोड, भोपाळ यांची नाशिकमध्ये मिळकत आहे.
संशयित आनंदकुमार सिंग ४४, प्रिती आनंदकुमार सिंग ४२ रा. सुषमा स्वरूप कॉलनी, गंगाजी रोड, करवील, चित्रकूट, उत्तरप्रदेश आणि संजय प्रभाकर भडके ५१ रा. चव्हाटा, जुने नाशिक या सर्वानी मिळून बबली सिंग यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून नाशिक येथे फेब्रुवारी २०१२ ते फेब्रुवारी २०१३ दरम्यान त्यांच्या मिळकतीचे ऍग्रीमेंट फॉर सेल तयार करून घेतले होते.
दरम्यान संशयितांनी बनावट दस्त तयार करून संशयित आनंदकुमार याने त्याची पत्नी प्रिती हीच बबली सिंग असल्याचे भासवून खोट्या स्वाक्षरी करीत संशयित बांधकाम व्यावसायिक संजय भडके याच्या मदतीने कट कारस्थान करीत फ्लॅट गिळंकृत करून त्यावर बांद्रा येथील एका बँकेकडून सहा कोटीचे कर्ज काढले. बबली सिंग यांनी गेल्या दहा वर्षात या फ्लॅटकडे लक्ष दिले नाही.
मात्र, त्यानंतर ज्यावेळी बँकेचे हप्ते थकले आणि बँकेने जप्तीसाठी कारवाई सुरु केल्याची नोटीस बबली सिंग यांना दिली त्यावेळी बबली सिंग यांना आपली जवळपास सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेत आपल्याबरोबर झालेल्या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) रविंद्र मगर करीत आहे.