आक्षेपार्ह उल्लेख असलेला स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याबद्दल दुःख : रक्षा खडसे

गुरूवार, 28 जानेवारी 2021 (21:31 IST)
भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिला लोकप्रतिनिधीबाबतचा आक्षेपार्ह उल्लेख असलेला स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याबद्दल आपल्याला दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच एखाद्या महिलेबाबतच्या प्रकरणात सत्ताधारी किंवा विरोधकांनी यामध्ये राजकारण न करता अशा गोष्टी व्हायरल करायला नकोत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
रक्षा खडसे म्हणाल्या, “ही गोष्ट  संध्याकाळी माझ्या लक्षात आली. त्यानंतर लगेच मी ज्यावेळी वेबसाईटवर जाऊन पाहिलं तेव्हा ते रावेरचं होतं. पण काही लोकांचं म्हणणं आहे की गुगल ट्रान्सलेटरवर रावेर शब्द टाकल्यास त्याचे वेगवेगळे उच्चार आणि अर्थ येत आहे. पण हे भाजपाकडून केलं गेल असेल असं मला वाटत नाही. कारण माझ्याकडे व्हॉट्सअॅपवर जे मेसेज आले किंवा जे स्क्रीनशॉट पाठवले गेले ते ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ या फेसबुक पेजवरील आहेत. हे पेज कोण चालवतंय ते आम्हाला माहिती नाही. यासंदर्भात माझं जिल्हा पोलीस प्रमुखांशी आणि पक्षाच्या लोकांशी बोलणं झालं असून याची चौकशी सुरु करण्यात आली आहे”
 
“ मी लगेचच भाजपाच्या अधिकृत पेजवर आणि वेबसाईटवर जाऊन पाहिलं तर तिथे मला कुठेही गडबड झालेली दिसली नाही. मला असं वाटतं की, कोणीतरी पेजचा स्क्रिनशॉट घेऊन त्यामध्ये एडिटिंग केलेलं दिसतंय. चौकशीमध्ये हे सर्व समोर येईलच.”
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती