साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्ह्याचे विचारी हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल, बेळगावमधील १८९० मध्ये बांधलेल्या पुलाचा मराठीतला शीलाफलक अशा प्रकारे कर्नाटकातल्या सीमा भागामधले शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीपासूनच्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे पुरावे सलगपणे समोरच्या कृष्णधवल पडद्यावर उलगडत जातात आणि आपण स्तिमित होतो. राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या माध्यामातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पुरावा सादर केला आहे.
सीमाभागातील वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाने ५० वर्षांपूर्वी तयार केलेला अ केस फॉर जस्टीस हा ३५ मिनिटांचा अप्रतिम आणि संग्राह्य लघुपट सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. पूर्वीच्या रिळांवर चित्रीकरण केलेल्या या चित्रपटाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डिजिटल स्वरुपात पुनरुज्जीवित केल्याने इतका जुना दस्तऐवज आपण सहजपणे पाहू शकतो. हा लघुपट आपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://www.youtube.com/watch?v=y_3Pi36ia-c या यूट्यूब वाहिनीवर पाहू शकतो.