‘लग्नासाठी मुलगा बघायला येणार होता, पण त्याआधीच आमच्या पोरीचा जीव गेला’, 250 रुपये मजुरीसाठी 5 मुलींनी गमावले प्राण
शनिवार, 15 जून 2024 (14:32 IST)
“तिला लग्नासाठी बुधवारी मुलगा बघायला येणार होता. तिच्या लग्नासाठी आम्ही खूश होतो. पण लग्नाआधीच आमची पोरगी गेली जी...” अमरावती महामार्गा शेजारच्या धामणा (लिंगा) गावातील 55 वर्षीय अलका मोदरे यांचा हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांची 23 वर्षांची असलेली पुतणी प्रांजली मोदरेला चामुंडी एक्सप्लोसिव्ह या कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडली होती. प्रांजलीच्या विवाहित बहिणी शेजारीच रडत बसल्या होत्या. तिची आई ज्ञानेश्वरी यांची तर शुद्ध हरपली होती. वडिलांना काय करावं सूचत नव्हतं. 250 रुपये मजुरीसाठी प्रांजली मोदरे गुरुवारी (13 जून) सकाळीच घरातून बाहेर पडली, पण परतली नाही. दुसऱ्या दिवशी तिचा जळालेला मृतदेहच पांढऱ्या कपड्यात गुंडाळून घरी आला. आपल्या लेकीचा मृतदेह घरी कधी येतो आणि लेकीला शेवटचं पाहतो, यासाठी प्रांजलीचं सगळं कुटुंब अमरावती महामार्गावरच रस्त्याकडे डोळे लावून बसलं होतं. दिसायला देखणी, लहान असल्यानं घरात सगळ्यांची लाडकी असलेली प्रांजली आता त्यांना कायमची सोडून गेली होती.
250 रुपये मजुरीसाठी गमावले प्राण
प्रांजली आणि प्रणाली या मोदरे कुटुंबातल्या दोन मुली. प्रणाली यांचं लग्न झालं आहे. अविवाहित असलेली प्रांजलीच आई-वडिलांचा आधार होती. मोदरेंच्या घरात एकही एकर शेती नाही. आज मजुरीनं गेलं नाहीतर उद्या खाणार काय अशी हलाखीची परिस्थिती आहे. प्रांजली आणि प्रणाली यांचे वडील किसन मोदरे एका स्टील कंपनीत मुजरी करतात. पण त्यांचीही प्रकृती ठीक नसल्यामुळे अलीकडे ते घरीच राहायचे. आई एकटी शेतमजुरी करायची. घरात आईला हातभार होईल म्हणून प्रांजली गेल्या दीड वर्षांपासून चामुंडी एक्लप्लोसिव्ह या कंपनीत 250 रुपये मजुरीनं जायची. तिला येत्या बुधवारी लग्नासाठी मुलगा बघायला येणार होता. सगळ्यांनी प्रांजलीच्या लग्नाचं स्प्न रंगवलं होतं. पण, गुरुवारी (13 जून) सकाळी ती घरातून कंपनीत गेली ती कायमचीच. प्रांजलीप्रमाणेच धामणा गावातल्या 19 ते 30 वयोगटातल्या पाच तरुणींचा स्फोटात होरपळून मृत्यू झाला. घरी चूल पेटावी म्हणून या पाचही तरुणी स्फोटकांच्या कंपनीत कामाला जायच्या. तीच स्फोटकं त्यांच्या जीवावर बेततील असा विचारही त्यांनी स्वप्नात केला नव्हता. तेच झालं आणि घराचा आधार असलेल्या तरुणींचा भीषण स्फोटात मृत्यू झाला. या स्फोटाचे हादरे गावातल्या मनामनांना बसले असून कोणी आक्रोश करत होतं, तर कोणाच्या मनात कंपनीबद्दल चीड, रोष दिसत होता.
मृतांची संख्या 8 वर
नागपूरपासून 40 किलोमीटर अमरावती महामार्गावर वसलेलं साडेचार हजार लोकवस्तीचं हे धामणा (लिंगा) गाव आहे. गावात मोजकी घरं कौलारु आहेत, तर बहुतांश घरं सिमेंट क्राँकिटची आहेत. नागपूरपासून जवळ असल्यानं या गावाचा काही प्रमाणात विकास झालाय. गावात सगळीकडे सिमेंटचे रस्ते दिसतात. गावात काही शेतकरी, काही शेतमजूर आहेत, तर काहीजण पोटाची खळगी भरण्यासाठी गावाला लागून असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत कामाला जातात. प्रांजली मोदरे (23), प्राची फलके (19), वैशाली क्षीरसागर (20), मोनाली अलोणे (23), शीतल चटप (30) या पाचही तरुणी गुरुवारी (13 जूनला) सकाळीच कंपनीत गेल्या. पण दुपारच्या जेवणाआधीच साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंपनीतल्या भीषण स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. स्फोट इतका भीषण होता की त्यांना कामाच्या ठिकाणाहून बाहेर सुद्धा पडता आलं नाही. काम करत होत्या त्याच ठिकाणी होरपळून आगीत त्यांचा जीव गेला. या स्फोटाचा आवाज गावातही आला. त्यामुळे सगळे लोक कंपनीच्या दिशेनं धावले. ज्यांच्या घरचे कंपनीत कामाला होते ते आपल्या पोरांचा शोध घेत होते. पण, त्यांचे मृतदेहच सापडले. पाच जणांचे जीव जागेवर गेले होते, तर चार जण जखमी झाले. त्यांना नागपुरातल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यातही शीतल चटप या तरुणीचा रुग्णालयात पोहोचताच मृत्यू झाला, तर ज्ञानसा मरसकोल्हे यांचाही दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान दंदे रुग्णालयात मृत्यू झाला. धामणा गावातली श्रद्धा पाटील ही तरुणी अत्यवस्थ होती. तिच्यावर उपचार सुरू असतानाच आज (15 जून) तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे मृतांची संख्या 8 वर पोहोचलीय. तर नेरी गावातला प्रमोद चावरे हा तरुण अत्यवस्थ असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
स्फोट कसा झाला? अधिकाऱ्यांनी काय कारण सांगितलं?
आम्ही स्फोट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 14 जूनला नागपूरवरून धामणा-लिंगा या गावात पोहोचले. गावात महामार्गाशेजारी अख्खं गाव एकत्र झालं होतं. याच गावाला लागून चामुंडी एक्सप्लोसिव्ह ही कंपनी आहे जिथं गुरुवारी (13 जून) ला स्फोट झाला होता. ही कंपनी 37 वर्षांपासून या गावाशेजारी आहे. गावापासून कंपनीपर्यंत जवळपास दोनशे पोलिस तैनात होते. त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरुप आलं होतं. आम्ही सुरुवातीला स्फोट झाला त्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत गेलो. या कंपनीला तीन गेट आहेत, तर जवळपास तीन युनिटमध्ये तिथे काम चालतं. तगड्या पोलिस बंदोबस्तातच आम्ही स्फोट झाला त्या प्लांटजवळ गेलो. तिथे दूरपर्यंत स्फोटाचे परिणाम दिसत होते. त्या प्लांटच्या समोरची झाडं पूर्णपणे जळाली होती. आजूबाजूचा परिसर धुरानं काळा झाला होता. तिथं एक्सप्लोसिव्ह डिपार्टमेंट, सुरक्षा विभाग, कामगार आयुक्त असे सगळे सरकारी अधिकारी आपआपला तपास करत होते. स्फोटामुळे सगळं छिन्नविच्छिन्न झालं होतं. स्फोटामुळे एका बाजूची भिंत तुटली होती. तिथल्या मशिनचे तुकडे झाले होते, त्यावर काळा धूर साचला होता. त्या खोलीचं वरचं छप्पर उडालं होतं, दारं-खिडक्यांसह पूर्ण खोलीत चार बोटं जाडीचा काळा धूर साचला होता. तिथला सगळा परिसरही धुळामुळे काळा झाला होता. पण, हे कशामुळे घडलं? नेमकं कारण काय? असं विचारलं तर सुरुवातीला अधिकारी सांगायला तयार नव्हते. घटना मोठी असल्यानं लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी सुरूच होत्या. सुरुवातीला दुपारी 12 च्या सुमारास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या स्फोटाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी एक्सप्लोसिव्ह डिपार्टमेंटचे अधिकारी अनुज कुमार यांनी स्फोटाचं कारण सविस्तर समजावून सांगितलं. त्यानुसार, ज्या प्लांटमध्ये स्फोट झाला तिथं फटाक्यांच्या वाती पॅकिंगचं काम चालायचं. त्यामध्ये दारुगोळा असल्यानं या ठिकाणी नियमानुसार इलेक्ट्रिक बॅटरी किंवा पेट घेणाऱ्या कुठल्याही वस्तू ठेवता येत नाही. पण या खोलीत इन्व्हर्टरची बॅटरी ठेवलेली होती. दुसरं म्हणजे फटाक्याची वात प्लास्टिकमध्ये सीलबंद करताना पॅकिंग मशिनचा वापर केला जातो. पॅकिंग करताना चुकून मशिन फटाक्याच्या वातीवर बसली आणि त्यातून स्पार्क झाला असावा. त्याच खोलीत दारुगोळा असलेला फटाक्यांच्या वातींचा साठा ठेवला होता. हा साठा, इन्व्हर्टरची बॅटरी यामुळे आग जास्त भडकली, असं अनुज कुमार यांनी त्यावेळी सांगितलं. दुसरं म्हणजे याठिकाणी फायर सेफ्टी होती, आग विझविण्यासाठी पाण्याचा मोठा बंब होता. पण सुरुवातीला त्याचा वापर झाला नाही. त्याचा वापर झाला असता तर आग इतकी भडकली नसती असं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. पण, सुरुवातीला आग विझविण्यासाठी कंपनीची फायर सेफ्टी वापरण्यात आली, असा दावा कंपनीचे मालक जयशिवशंकर खेमका यांचे मित्र कुणाल कर्णिक यांनी केला.
कंपनीचा दावा काय आहे?
कंपनीचे मालक जयशिवशंकर खेमका आणि कंपनीच्या मॅनेजरला अटक झाली होती. त्यामुळे कंपनीची बाजू मांडण्यासाठी खेमका यांचे कौटुंबिक मित्र कुणाल कर्णिक आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितलेली कारण त्यांनी फेटाळून लावली. ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्था (PESO)चं प्रशिक्षण आमच्या कंपनीत होत होतं. सुरक्षेच्या दृष्टीनं कंपनी कशी असायला हवी, याचं उदाहरण PESO कडून दिलं जायचं. दरवर्षी आम्ही सुरक्षेचं ऑडिट व्हायचं. पण, हे कसं घडलं माहिती आहे. पण, कंपनीच्या मालकांनी जबाबदारी घेण्याचं आश्वासन दिलं असून आम्ही मृतांच्या कुटुंबीयांना सगळी मदत करायचं ठरवलं आहे.
पाच तरुणींच्या कुटुंबियांचा शोक
कंपनीतून आम्ही गावात गेलो. सगळं गाव महामार्गाला लागून असलेल्या घराच्या अंगणात एकत्र झालं होतं. आमच्या मुलीला कोणीतरी परत आणा, तिला पाहाचंय, असा हंबरडा पाचही तरुणींचे कुटुंब फोडत होते. मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानं बाहेरगावच्या नातेवाईकांचीही गर्दी झाली होती. मृतांच्या घरच्या लोकांचा आक्रोश पाहून अख्ख्या गावाच्या डोळ्यात पाणी होतं. कंपनीला भेट दिल्यानंतर नितीन गडकरी यांनी मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेतली. आम्हाला मदत पाहिजे, कंपनीवर कारवाई करा, अशा मागण्या ग्रामस्थांनी मृतांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी त्यांनी कंपनीकडून 25 लाख आणि शासनाकडून 10 लाख रुपये मदतीचं आश्वासन दिलं. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे यांनीही मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आम्ही मदत मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. पण, आश्वासन दिलेली मदत पुढे मिळेल की नाही याची खात्री ग्रामस्थांना नव्हती. स्फोटात जीव गेलेल्या तरुणी घरचा आधारवड होत्या. त्यांनी केलेल्या कामावर घरातलं तेल-मीठ चालायचं. त्यामुळे या कुटुंबांना मदत आताच मिळावी असा ग्रामस्थांचा आग्रह होता.
गावकऱ्यांच्या घोळक्यात एक आजी हुंदके देत होती. माझ्या नातीचं आता कसं होणार? असं म्हणत रडत होती. कारण, त्यांची विवाहित मुलगी शीतल चटपचा (वय-30 वर्षं) या स्फोटात मृत्यू झाला होता. शीतलंचं 2017 मध्ये लग्न झालं होतं. खापरखेडाजवळील सिल्लेवाडा हे तिचं सासर होतं. पण, नवरा व्यसनी असल्यानं ती आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह माहेरी आईजवळ राहायची. मुलीला कॉन्व्हेंटमध्ये शिकवायचं आहे म्हणून ती 250 रुपये मजुरीनं चामुंडी कंपनीत काम करत होती. पण, या स्फोटात तिचा मृत्यू झाला आणि मुलीच्या शिक्षणाचं स्वप्न अधुरंच राहिलं. पाच वर्षांची ही चिमुकली वडिलांकडे अजिबात जात नाही. आता तिची आजीच तिचा सांभाळ करणार आहे. क्षीरसागर यांचं घर पत्र्याचं असून घराला पूर्ण भिंती सुद्धा नाहीत. त्या स्वतः दुसऱ्यांच्या कपड्यांना इस्त्री करून आपलं पोट भरतात. त्यामुळे आता नातीच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, तिला इंग्रजी माध्यमात शिकविण्याचं मुलीचं स्वप्न कसं पूर्ण करायचं? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे सरकारनं नातीच्या शिक्षणासाठी मदत करावी, अशी मागणी शीतल यांच्या आईने बीबीसी मराठीसोबत बोलताना केली.
वडील अपंग, वैशालीचा मृत्यू झाला आणि घराचा आर्थिक कणा मोडला
याच घोळक्यात पोटची लेक गमावलेली आई अनिता क्षीरसागर अगदी सुन्न होऊन बसल्या होत्या. त्यांची 20 वर्षांची मुलगी वैशाली क्षीरसागरचा स्फोटात जागीच मृत्यू झाल्यानं त्यांना मोठा धक्का बसला होता. एकाच कौलारू खोलीत आई, वडील, भाऊ आणि वैशाली राहत होती. वैशालीचे वडील अपंग आहेत. त्यामुळे ते घरीच असतात, तर आई दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जाते. आईला मदत होईल म्हणून शेजारच्या प्रांजली मोदरेसोबत ती गेल्या 1 वर्षांपासून चामुंडी कंपनीत कामाला जायची. पण, वैशालीचा स्फोटात मृत्यू झाला आणि घराचा आर्थिक कणा मोडला.
मुलीला कंपनीत जाऊ नको म्हणत होते
याच गर्दीत मुलीला कंपनीत नको जाऊ म्हणत होती, पण ती मैत्रिणींसोबत हट्टानं जायची...आता काय झालं माझ्या मुलीचं, असा हंबरडा ऐकायला आला. 45 वर्षांच्या सुरेखा फलके आणि त्यांच्या जाऊबाई मोठमोठ्यानं रडत होत्या. कारण, त्यांनी आपली 19 वर्षांची मुलगी या स्फोटात गमावली होती. प्राचीला आणखी तीन बहिणी आहेत. त्यांचं अर्ध घर टिनांचं, अर्ध कौलारू आहे. आई दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जाते आणि वडील मानसिकरित्या आजारी असल्यानं त्यांना काम जमत नाही. “मी काम करायला सक्षम होती. मुलीला कामाला जाऊ नको म्हणत होते. पण, बारावी नापास झाल्यानंतर घरात करमत नाही म्हणून ती प्रांजली आणि वैशाली या दोन्ही मैत्रिणींसोबत कंपनीत कामाला जात होती. पण या कंपनीनं माझ्या मुलीचा जीव घेतला,” असं सुरेखा फलके सांगत होत्या.
माझ्या मोनालीचा जागेवरच जीव गेला होता
महामार्गाच्या शेजारी असलेल्या गर्दीत एक कुटुंब दिसलं नाही ते म्हणजे 25 वर्षीय मोनाली अलोणेचं. कारण मोनालीच्या मृत्यूमुळे आईला धक्का बसला होता. त्यांना सारखी चक्कर येत होती. तिचे वडील शंकरराव अलोणे यांना काय करावं सुचत नव्हतं. शंकरराव अलोणे यांचं अमरावती महामार्गाच्या शेजारीच पक्कं घर आहे. ते देखील चामुंडी कंपनीत कामाला जातात. पण, गुरुवारी त्यांची दुसरी शिफ्ट होती म्हणून ते घरीच होते. “स्फोट झाल्याचा आवाज आला तर आधी मी धाव घेतली. माझी मोनाली कुठे आहे असं विचारलं. सगळे म्हणाले आतमध्ये आहे. मी तिथंच आशा सोडली. तरीही मन घट्ट करून आतमध्ये गेलो तर माझ्या मोनालीचा जागेवरच जीव गेला होता. तिच्या आईला धक्का बसलाय. सारखी चक्कर येतेय. माझ्या घरचा जीव गेला आणि मदतीचं आता काय करू, आमचा जीव भरून देणार आहे का? असं बीबीसी मराठीसोबत बोलताना मोनालीच्या वडिलांना गहिवरून आलं.” मोनालीचं 2021 मध्ये लग्न झालं होतं. पण, काही कारणांमुळे ती वडिलांच्या घरी राहायची. तिचा घटस्फोटाचा खटला सुरू होता. तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचारही वडील करत होते. 15 जून शुक्रवारी घटस्फोटाचा निकाल लागणार होता. पण, त्याच्या दोन दिवसांआधीच मोनालीचा स्फोटात मृत्यू झाला.
एकाच गल्लीतल्या चारही मैत्रिणींचा मृत्यू
प्रांजली मोदरे, वैशाली क्षीरसागर, प्राची फलके आणि शीतल चटप या चौघी मैत्रिणी होत्या. चौघींचेही घर एकाच गल्लीत होते. “दररोज कंपनीतून आल्या, जेवण झालं की रात्रीच्या वेळी गल्लीत फिरायच्या. त्यांच्या हसण्याच्या आवाज आला की आम्ही बाहेर यायचो. मग घोळका करून याच गल्लीत सगळ्याजणी गप्पा मारत बसायचो. आताही असं वाटतं की त्या जिवंतच आहेत. कंपनीतून येतील आणि मला आवाज देतील,” असं त्यांची मैत्रीण मोना साखरकर सांगत होती. या चौघींच्या आठवणीत गहिवरत मोना साखरकरची आई रात्री गावात एकही चूल फेटली नसल्याचं सांगत होत्या.
मृतदेह घेऊन रुग्णवाहिका आली आणि ग्रामस्थांचा रोष वाढला
सकाळपासून या मुलींचे कुटुंबिय त्यांच्या मृतदेहाच्या प्रतीक्षेत महामार्गाशेजारीच बसले होते. कुठलीही गाडी आली की आमच्या लेकीचा मृतदेह आला असेल, तिचा शेवटचा चेहरा एकदा पाहचाय असा विचार करत महामार्गाकडे पाहायच्या. शेवटी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गावातल्या पाचही तरुणींचे मृतेदह घेऊन रुग्णवाहिका आल्या. गावातल्या तरुण मंडळींनी या रुग्णवाहिका महामार्गावच रोखल्या. आम्हाला आधी मदतीचे चेक द्या तेव्हाच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बॅरिकेड्स लावून मृतदेह उतरविण्याचा प्रयत्न केला. पण, ग्रामस्थ इतके आक्रमक झाले होते की त्यांनी बॅरिकेड्स तोडले. आम्हाला आधी मदत द्या, अशा घोषणा सुरू केल्या. त्यानंतर ग्रामस्थांनीच मृतदेह असलेल्या रुग्णवाहिका जिथं स्फोट झाला त्या कंपनीच्या समोर नेल्या. जवळपास दोन तास तिथं वाटाघाटी चालल्या. सरकारी अधिकारी तसंच पोलिस कंपनीच्या मालकाला मदत देण्यासाठी विनंती करत होते. शेवटी अडीच तासांनंतर कंपनीच्या मालकानं मदतीचे चेक दिले. आमदार अनिल देशमुख यांनी प्रत्येकी 25 लाख रुपये मदतीचे चेक मृतांच्या नातेवाईकांना वितरित केले. यानंतर नातेवाईकांनी जवळपास सहा वाजण्याच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर या पाचही तरुणींवर गावातल्या स्मशानभूमीत एकाचवेळी अत्यंसंस्कार करण्यात आले.