व्यसनमुक्तीसाठी हॉस्पीटलमध्ये दाखल असलेल्या तरूणाला रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यास सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या तरूणाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला असून व्यसनमुक्ती केंद्र चालकांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन नातेवाईकांनी पोलिस प्रशासनास दिले आहे. त्यावर मृताचा योग्य पध्दतीने तपास केला जाईल व कारवाई होईल असे आश्वासन पोलिस प्रशासनाने नातेवाईकांना दिले आहे. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.
प्रवीण अमृत करंडे (वय २७, रा. होमकर नगर, भवानी पेठ, सोलापूर) असे मयत तरूणाचे नाव आहे. मयत करंडे यांना दारूचे व्यसन होते. मागील तीन दिवसापासून करंडे यांना व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी मीरा हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने व दम लागत असल्यामुळे तसेच शरीरातील ऑक्सीजन व बीपी कमी झाल्यामुळे त्यांना बेशुध्दावस्थेत मीरा हॉस्पीटलच्या स्टाफने सिव्हिल हॉस्पीटल येथे दाखल केले. परंतु, करंडे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉ. श्रीकृष्ण बागल यांनी घोषित केले. अशी नोंद सिव्हील पोलिस चौकीतकरण्यात आली आहे.
दरम्यान, करंडे यांच्या नातेवाईकांनी करंडे याचा मृत्यू मीरा व्यसनमुक्ती केंद्राच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली.. त्यावेळी सदर बझार पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजित लकडे व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पीटल येथे नातेवाईकांची भेट घेऊन मृतदेहाचे शवविच्छेदन तीन डॉक्टरांच्या उपस्थितीत इन कॅमेरा करण्याचे आश्वासन देत दोर्षीवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.