म्हणूनच पत्नीनेच पतीचा काटा काढला

मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (09:58 IST)
नागपूरमध्ये पती सतत मारझोड करत असल्याने पत्नीनेच पतीचा काटा काढला. यात छळ करणाऱ्या नवऱ्याला पार्टीसाठी शेतावर बोलून त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याकरता पत्नीने पन्नास हजाराची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. केळवद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नरसाळा-खापा शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटली असता तो जयदीप लोखंडे (३९) चा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
 
जयदीप हा पत्नी कविताला सतत मारझोड करायचा. तसेच तिचा मानसिक छळ देखील करायचा. या सततच्या त्रासाला जयदीप लोखंडेची पत्नी कविता लोखंडे कंटाळली होती. त्यामुळे तिने पतीला कायमचे संपवायचे ठरवले. या उद्देशाने सावनेरमधील खेडकर लेआऊट येथील चंदन नथ्थू दियेवार (२८) या तरुणाला हाताशी घेत पती जयदीपला संपवायचा कट रचला. यासाठी तिने छिंदवाडा येथील रहिवासी सुनील जयराम मालविय (२७) याला ५० हजार रुपये देऊन जयदीपचा खून करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे ९ ऑक्टोबरला आरोपी चंदनने सुनील याचा वाढदिवस असल्याचे जयदीपला सांगत नरसाळा परिसरातील पडीक शेतावर पार्टी करण्यासाठी दुचाकीवरुन नेले. त्याठिकाणी सुनील आधीच उपस्थित होता. दोन्ही आरोपींनी त्याच्या गळ्यावर चाकूने वार करत त्याला ठार केले आणि घटनास्थळावरुन पळ काढला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती