अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ११६ जनावरांना ‘लम्पी स्कीन’ लागण, ३ जनावरांचा मृत्यु

सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (21:30 IST)
अहमदनगरसह जळगाव, अकोला, पुणे व धुळे जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये वेगाने होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ११६ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. यातील ३ जनावरांचा दुर्देवाने मृत्यु झाला आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन व कृषी विभाग युध्दपातळीवर उपाययोजना करत आहे. राज्य शासनाने १ सप्टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय जारी करत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. जनावरांचे वेगाने लसीकरण करण्यात येत आहे.
 
‘लम्पी स्कीन’ हा रोग १९२९ पासून १९७८ पर्यंत मुख्यत्वे आफ्रिकेत आढळत होता. नंतर हळूवारपणे या रोगाने शेजारच्या देशात शिरकाव केला. २०१३ नंतर या रोगाचा सर्वदूर प्रसार वेगाने होत आहे. आणि आता हा रोग अनेक युरोपीय व आशियायी देशात पसरला आहे. भारतात या रोगाची पहिली नोंद ऑगस्ट २०१९ मध्ये ओरिसा राज्यात झाली. त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व केरळ राज्यात या आजाराचा शिरकाव झालेला आढळून आला. महाराष्ट्रात या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथून मार्च २०२० या महिन्यापासून झालेला आढळून आलेला आहे. येथील साथरोगांचे पक्के निदान गोपाळ येथील राष्ट्रीय रोग निदान प्रयोगशाळेत झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती